पुलांचा अभाव; गावकऱ्यांची पाण्यातून वाटचाल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:27 AM2021-07-21T04:27:33+5:302021-07-21T04:27:33+5:30
पावसाळ्याच्या दिवसांत नादुरुस्त पूल, रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांसह जिल्हा प्रशासनाने बांधकाम विभागाला यापूर्वीच दिलेले आहेत. तथापि, अद्यापही अनेक ...
पावसाळ्याच्या दिवसांत नादुरुस्त पूल, रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांसह जिल्हा प्रशासनाने बांधकाम विभागाला यापूर्वीच दिलेले आहेत. तथापि, अद्यापही अनेक ठिकाणी जमीन समांतर असलेल्या नदी, नाल्यांवर पुलाची निर्मिती नाही. मानोरा तालुक्यातील चाकूर - गव्हा रस्त्यावरील पूलही जमीन समांतर आहे. सोमवारी रात्रीच्या पावसामुळे पूर आला असून, चाकूर गावातील नागरिकांना पर्यायी रस्ता नसल्यामुळे पाण्यातून वाटचाल करावी लागत आहे. एकमेकांच्या हातात हात घालून नागरिकांना रस्ता ओलांडण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. रिसोड तालुक्यातील जायखेडा-नेतन्सा या ग्रामीण रस्त्यावरील नाल्यावरही पूल नाही. या ठिकाणीदेखील अशीच परिस्थिती ओढवते. संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
००००
बांधकाम विभागाने लक्ष द्यावे !
पावसाळ्याच्या दिवसांत पुलांअभावी काही गावांचा संपर्क तुटतो. पर्यायी रस्ता नसल्याने जमीन समांतर असलेल्या नदी, नाल्यांच्या पाण्यातून मार्गक्रमण करीत अनेक नागरिक धोका पत्करतात. हा धोका कधी जीवावरही बेतू शकतो. गत तीन, चार दिवसांपासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात संततधार पाऊस असल्याने नदी, नाले ओसांडून वाहत आहेत.