मजुरांचा अभाव; तणनाशक वापरात वाढ!
By admin | Published: August 2, 2016 01:49 AM2016-08-02T01:49:27+5:302016-08-02T01:49:27+5:30
वाशिम तालुक्यात २0 हजार लिटर तणनाशकाची विक्री : पिके बहरली.
वाशिम: जिल्ह्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे शेतात तणांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढले. अशातच मजुरांचा अभाव आणि कुठे मजुरीचे वाढलेले दर यामुळे शेतकरी तणनाशकाच्या फवारणीकडे वळल्याने आपसूकच तणनाशकाच्या वापरात वाढ झाल्याचे दिसून येते. एकट्या वाशिम तालुक्यातून ३0 जुलैपर्यंत २0 हजार तणनाशकाची विक्री झाल्याची माहिती आहे. यावर्षी चार लाख तीन हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. गत आठवड्यापासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. पावसाने थोडी उघडीप देताच कोळपणी, फवारणीच्या कामांना शेतकर्यांनी वेग दिला. दरम्यान, अनेक ठिकाणी मजुरांचा अभाव दिसत असल्याने आणि काही ठिकाणी मजुरीचे दर गगनाला भिडल्याचे पाहून शेतकरी तणनाशकाच्या फवारणीला पसंती देत असल्याचे कृषी सेवा केंद्रातील गर्दीवरून दिसून येते. सोयाबीन, कपाशी, मका व काही प्रमाणात कडधान्य पिकांची कोळपणी व तणनाशक औषधांची फवारणीची कामे सुरू करीत आहेत. तसेच पिकांवर तणनाशकाचा वापर वाढला असल्याचे दिसून येत आहे. चांगल्या पावसाने जिल्ह्यातील पीक परिस्थिती उत्तम आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकर्यांची धडपड सुरू आहे.