उपशामुळे पिण्याचे पाणी मिळेना; जनावरांसह पशुपालक ग्रामपंचायतमध्ये धडकले
By संतोष वानखडे | Published: November 15, 2023 12:30 PM2023-11-15T12:30:52+5:302023-11-15T12:31:07+5:30
फुलउमरी परिसरात प्रकार : नाल्यातून पाण्याचा उपसा
संतोष वानखडे, वाशिम : मानोरा तालुक्यातील फुलउमरी येथील खडकाळी व गोबरा नाल्यावर अनेक शेतकऱ्यांनी इलेक्ट्रिक मोटारपम्प लावून शेती सिंचनाखाली आणल्यामुळे येथील गोपालकांच्या गुरांना नाल्यातून पिण्याचे पाणी मिळेनासे झाले. परिणामी, दोन्ही नाल्यावरील इलेक्ट्रिक मोटार पंप काढण्याच्या मागणीसाठी १५ नोव्हेंबर रोजी पशुपालकांनी आपले गुरे ग्रामपंचायत कार्यालयात आणून अनोखे आंदोलन केले.
फुलउमरी येथे चार कळप असून गावातील चार इसम गुरे चराईचे काम करतात. गावातील गुरांना पिण्याच्या पाण्याची सोय खडकाळी व गोबरा नाल्यावर केली जाते. मात्र गावातील १५ ते २० शेतकऱ्यांनी शेती सिंचनाची सोय नाल्यावरच्या पाण्यावर केल्यामुळे नाल्यात पाणी साठा राहत नाही. परिणामी, पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे गुराख्यांनी नाल्यावरील इलेक्ट्रिक मोटार काढा, त्यानंतरच गुरे चारू असा पवित्रा दोन दिवसाआधी घेतल्याने गुरे घरी ठेवण्याची वेळ पशुपालकावर आली. त्यामुळे गुराखी व पशुपालकांनी १५ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे आपले गुरे आणून नाल्यावरील इलेक्ट्रिक मोटार पंप काढण्यात यावे असी मागणी केली.