आवश्यक कागदपत्रांचा अभाव; सोयाबीनच्या १८४६ बॅगची विक्री थांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 06:07 PM2021-05-20T18:07:08+5:302021-05-20T18:07:13+5:30
Washim News : सोयाबीनच्या १८४६ बॅग तसेच कापूस बियाण्याच्या २७० पॅकेटला विक्री बंदचे आदेश कृषी विभागाने गुरूवारी दिले आहेत.
वाशिम : वाशिम व मंगरूळपीर तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांची झाडाझडती घेतली असता, रिलीज आॅर्डर व आवश्यक ती कागदपत्रे आढळून न आल्याने सोयाबीनच्या १८४६ बॅग तसेच कापूस बियाण्याच्या २७० पॅकेटला विक्री बंदचे आदेश कृषी विभागाने गुरूवारी दिले आहेत. या कारवाईमुळे कृषी सेवा केंद्रांचे धाबे दणाणले असून, अनियमितता करणाºयांची गय केली जाणार नसल्याचा स्पष्ट इशाराही कृषी विभागाने दिला आहे.
खरीप हंगाम तोंडावर आला असून, शेतकºयांची गैरसोय तसेच फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागातर्फे कृषी सेवा केंद्रांची झाडाझडती घेतली जात आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक रमेश भद्रोड यांच्या पथकाने १९ मे रोजी वाशिम शहरातील तीन कृषी सेवा केंद्रांची झाडाझडती घेतली. तपासणीदरम्यान १८ मे २०२१ रोजी विविध आठ कंपन्यांच्या पुरवठा झालेल्या सोयाबीन बियाण्याचे आवश्यक दस्ताऐवजाची मागणी केली असता दस्ताऐवज उपलब्ध न झाले नाहीत. यामुळे सोयाबीनच्या १५४६ बॅगची (किंमत ४४.९० लाख) विक्री थांबविण्यात आली आहे. या साठ्यास विक्री बंदचे आदेश देतानाच, पुढील तीन दिवसात आवश्यक कागदपत्रे, रिलिज आॅर्डर दाखविण्यात यावी अन्यथा पुढील कारवाई करण्याचा इशारा कृषी विभागाने दिला. २० मे रोजी मंगरूळपीर येथील चार कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली असता, रिलिज आॅर्डर व अन्य कागदपत्रे आढळून न आल्याने सोयाबीनच्या ३०० बॅग तसेच कापूस बियाण्याचे २७० पॅकेटला विक्री बंदचे आदेश दिले.