दोन महामार्गांवरील शेलूबाजारच्या मुख्य चौकात गतिरोधकाचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:38 AM2021-03-07T04:38:13+5:302021-03-07T04:38:13+5:30
शेलूबाजार ही मंगरुळपीर तालुक्यातील मोठी बाजारपेठ आहे. पूर्वीच येथील बाजारपेठेच्या मुख्य चौकातून नागपूर-औरंगाबाद हा द्रुतगती मार्ग जातो, तर आता ...
शेलूबाजार ही मंगरुळपीर तालुक्यातील मोठी बाजारपेठ आहे. पूर्वीच येथील बाजारपेठेच्या मुख्य चौकातून नागपूर-औरंगाबाद हा द्रुतगती मार्ग जातो, तर आता अकोला-आर्णी या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर त्याचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण करण्यात आले. यामुळे पादचारी आणि प्रवाशांना रस्ता ओलांडण्यासाठी फारशी जागा उरली नाही. त्यात अकोला-आर्णी महामार्गाच्या निर्मितीनंतर वाहनांचा वेगही वाढला आहे. या मार्गावर वाहने सुसाट धावतात. दुसरीकडे नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावरही मोठ्या प्रमाणात जडवाहतूक सुरू असते. यामुळे चौकात बालके, वयोवृद्ध आणि महिलांना रस्ता ओलांडणे अवघड झाले आहे. घाईगडबडीने मार्गक्रमण करणाऱ्या वाहनचालकांमुळे या चौकात अपघात घडण्याची भीती वाढली आहे. एखाद वेळी भरधाव वाहनामुळे अपघात घडून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे धोकादायक ठरणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी येथे रबरी गतिरोधक बसविणे आवश्यक असून, तशी मागणीही ग्रामस्थ, प्रवाशांकडून केली जात आहे.