लसीचा तुटवडा, नागरिक आल्यापावली परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:52 AM2021-09-16T04:52:17+5:302021-09-16T04:52:17+5:30
कोंडोली : येथे आरोग्य विभागाकडून १४ सप्टेंबरला कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी अनेक नागरिकांनी रितसर नोंदणी केली; ...
कोंडोली : येथे आरोग्य विभागाकडून १४ सप्टेंबरला कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी अनेक नागरिकांनी रितसर नोंदणी केली; मात्र, ऐनवेळी लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने लसीकरण केंद्रावर आलेल्या नागरिकांना आल्यापावली परत जावे लागले.
कोंडोली येथील अंगणवाडी क्रमांक एकमध्ये १४ सप्टेंबरला लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. १८ ते ६० वर्षे वयोगटांतील नागरिकांना कोव्हॅक्सीनचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला. गावात दवंडी देण्यात आली की, अंगणवाडी क्रमांक दोनमध्येही लस देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक अंगणवाडी क्रमांक दोनमध्ये जमा झाले; मात्र तिथे आरोग्य विभागाकडून कोणीही हजर नव्हते. अंगणवाडीसेविकांनी ग्रामपंचायत कार्यालयात शिबिर असल्याने सांगितल्यानंतर गावकरी त्याठिकाणी गेले. तिथे आरोग्यसेविका ग्रामपंचायत कार्यालयाच्या पायऱ्यांवर बसून होत्या. त्यांना विचारले असता अंगणवाडी क्रमांक एकमध्येच शिबिर सुरू असल्याचे कळले. यामुळे एकाच दिवशी मोठा गोंधळ उडाला. बरेच नागरिक आल्यापावली घरी परत गेले.
अंगणवाडी क्रमांक एकमध्येही शिबिराला सुरुवात झाल्यानंतर लस देणाऱ्या आणि घेणाऱ्यांनाही अडचणीचा सामना करावा लागला. ग्रामसेवकाने एका खासगी व्यक्तीकडे ‘ऑनलाईन’ नोंदणीचे काम सोपविले. यावेळी ग्राम पंचायत उपसरपंच गजानन राऊत, ग्रामसेवक आर. आर. शिंदे, मुख्याध्यापक योगिराज शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर ठोंबरे उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी आरोग्य समुदाय अधिकारी प्रीती गणुजे, आरोग्यसेविका मोनाली तेलंग, पी. आर. बांगर, अंगणवाडीसेविका सुनंदा खिराडे, आशासेविका सुषमा जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी दिलीप नागपुरे, कोतवाल देवीदास खडसे यांनी पुढाकार घेतला.