लाख सांगूनही वेळेत दवाखान्यात नाही नेले, सर्पदंशाने युवकाचे प्राण गेले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:28 AM2021-06-25T04:28:40+5:302021-06-25T04:28:40+5:30
मंगरूळपीर तालुक्यातील चिंचाळा येथे २२ जून रोजी सकाळी शेतातील कडब्याचे कुटार काढत असताना अक्षय जाधव या २२ वर्षीय युवकास ...
मंगरूळपीर तालुक्यातील चिंचाळा येथे २२ जून रोजी सकाळी शेतातील कडब्याचे कुटार काढत असताना अक्षय जाधव या २२ वर्षीय युवकास नाग या विषारी सापाने चावा घेतला. त्याने घरी धाव घेत ही माहिती दिली. त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते. तथापि, त्याच्यावर घरगुतीच उपचार करण्यात आले. दरम्यान, ही घटना कळल्यानंतर साप पकडण्यासाठी तेथे गेलेले सर्पमित्र तथा जिल्ह्याचे मानद वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे यांनी त्या युवकास तातडीने रुग्णालयात नेण्याचा आग्रहही गावकरी व त्या युवकाच्या नातेवाइकांकडे केला; परंतु लाख वेळा सांगूनही त्यांनी तसदी घेतली नाही. त्या युवकास भोवळ येऊ लागल्याने अखेर रुग्णालयात नेण्याची तयारी झाली. यादरम्यान दोन तास वेळ गेल्याने युवकावर उपचारास विलंब झाला. मंगरूळपीर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले, त्यानंतर त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले; परंतु त्या युवकाचे प्राण वाचू शकले नाही.
----------------
बुवाबाजीवर कारवाईची अंनिसने केली होती मागणी
चिंचाळा येथे नाग चावल्यानंतरही संबंधित युवकास रुग्णालयात न नेता बुवाबाजीच्या आधारे उपचार करण्यात आल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वाशिम जिल्हा संपर्क प्रमुखांना मिळाली. त्यावरून या प्रकरणी चौकशी करून कारवाईची मागणी त्यांनी पोलिसांकडे केल्याचीही माहिती आहे; परंतु या प्रकरणी मंगरूळपीर पोलिसांनी नेमकी कोणती कारवाई किंवा चौकशी केली, ते कळू शकले नाही.
----------------
२१ व्या शतकातही बुवाबाजी कायम ?
विषारी सापाने दंश केल्यानंतर त्यावर रुग्णालयातच उपचार करून प्राण वाचविले जाऊ शकतात. ही बाब सूर्यप्रकाशाएव्हढी स्पष्ट असतानाही आजच्या २१ व्या युगात ग्रामीण भागातील अनेक लोक सर्पदंशावर उपचारासाठी बुवाबाजीचा आधार घेतात. हा प्रकार चुकीचा असल्याचे विविध वन्यजीव प्रेमी संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून सांगितले जात असतानाही ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी सर्पदंशावर उपचारासाठी बुवाबाजीचा आधार घेतला जातो.
----
कोट: चिंचाळा येथील युवकास साप चावल्याचे कळल्यानंतर त्यास रुग्णालयात नेण्याचा सल्ला आपण दिला; परंतु वारंवार विनंती करूनही वेळीच लक्ष न दिल्याने उपचारास विलंब झाला. दोन तासांनी त्याला रुग्णालयात हलविण्यात आले आणि डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न करूनही त्या युवकाचे प्राण मग वाचू शकले नाही.
- गौरवकुमार इंगळे,
सर्पमित्र तथा, मानद वन्यजीवरक्षक वाशिम