पावसाळ्यातही बाजार समित्यांत मोठी आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:30 AM2021-07-17T04:30:56+5:302021-07-17T04:30:56+5:30

जिल्ह्यात खरीप हंगामाची पेरणी पूर्णपणे उरकली आहे. गत महिन्याच्या अखेरपासून या महिन्याच्या पूर्वार्धापर्यंत पावसाने खंड दिल्याने पिके संकटात सापडली ...

Large inflows in market committees even during monsoons | पावसाळ्यातही बाजार समित्यांत मोठी आवक

पावसाळ्यातही बाजार समित्यांत मोठी आवक

googlenewsNext

जिल्ह्यात खरीप हंगामाची पेरणी पूर्णपणे उरकली आहे. गत महिन्याच्या अखेरपासून या महिन्याच्या पूर्वार्धापर्यंत पावसाने खंड दिल्याने पिके संकटात सापडली होती. आता पावसाचे पुनरागमन झाल्याने पिकांची स्थिती सुधारली आहे. या पिकांत तणनाशक फवारणी, कीटकनाशक फवारणी, डवरणी, खुरपणीसह खत देण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. अशा काळात बाजार समित्यांमधील शेतमालाची आवक खूप मंदावते; परंतु अनेक शेतकऱ्यांकडे ही कामे करण्यासाठी पैसे नाहीत. त्यात पीककर्ज मिळण्यास विलंब लागत आहे. त्यामुळे हाताशी घरी ठेवलेला शेतमाल शेतकरी विकत असल्याने बाजार समित्यांत अद्यापही मोठ्या प्रमाणात शेतमालाची आवक होत आहे.

-------

कारंजात पाच हजार क्विंटलवर आवक

जिल्ह्यातील जवळपास सर्वच बाजार समित्यांत भर पावसाळ्यातही शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. वाशिम, मंगरुळपीर, कारंजा, रिसोड, मालेगाव आणि मानोरा या सर्वच बाजार समित्यांत शेतमालाची किमान हजार क्विंटलपेक्षा अधिकच आवक होते. त्यात कारंजा आणि मंगरुळपीर बाजार समितीमध्ये शेतमाल आवकीचे प्रमाण अधिक असून, कारंजात शुक्रवारी ४९५० क्विंटल शेतमालाची आवक झाली होती.

----------

आठवडाभर बंद राहिल्याचा परिणाम

गत आठवड्यात जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमधील शेतमाल खरेदीचे व्यवहार व्यापाऱ्यांनी बंद ठेवले होते. केंद्र शासनाने शेतमाल साठवणुकीवर लावलेल्या निर्बंधामुळे व्यापाऱ्यांनी शेतमालाची खरेदी बंद ठेवली होती. या काळात गरज असतानाही हजारो शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करणे शक्य झाली नाही. या कारणामुळेही आता बाजार समित्यांत शेतमालाची आवक वाढल्याचे दिसत आहे.

---------------

शेतमाल दरातील तेजीही कायम

जिल्ह्यात गतवर्षाच्या अखेरपासून शेतमालाच्या दरात सतत तेजी पाहायला मिळत आहे. सोयाबीन, तूर, मूग, उडीद, हरभरा अशा प्रत्येकच शेतमालास हमीदरापेक्षा अधिक दर बाजार समित्यांत मिळू लागले आहेत. आता पावसाळा लागला तरी शेतमालाच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली नाही. त्यात सोयाबीनचे दर अद्यापही साडेसात हजारांपेक्षा अधिक असल्यानेही आवक स्थिर आहे.

Web Title: Large inflows in market committees even during monsoons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.