‘आपले सरकार सेवा केंद्र’साठी अर्ज सादर करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 01:10 PM2019-06-09T13:10:59+5:302019-06-09T13:11:28+5:30
पले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी जिल्ह्यातील ११७ रिक्त ठिकाणांकरीता ३० मे पासून अर्ज मागविले आहेत. १० जूनपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ई गव्हर्नस कृती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत शासकीय, निमशासकीय व खासगी सेवा पोहचविण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर योजना राबविली जात आहे. त्यानुसार आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी जिल्ह्यातील ११७ रिक्त ठिकाणांकरीता ३० मे पासून अर्ज मागविले आहेत. १० जूनपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.
वाशिम तालुक्यातील १०, मालेगाव व मंगरूळपीर तालुक्यातील प्रत्येकी १५, रिसोड तालुक्यातील १८, कारंजा तालुका ३८ आणि मानोरा तालुक्यात २१ अशा एकूण ११७ ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र रिक्त आहेत. या रिक्त ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्राची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. यासाठी ३० मे २०१९ पासून जिल्हा प्रशासनाने अर्ज मागविले आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १० जून आहे. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी ११ ते १४ जून २०१९ या कालावधीत होणार असून, १८ जून २०१९ रोजी पात्र-अपात्र अर्जांची यादी प्रसिद्ध होईल. अर्जांचा नमुना, आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करावयाच्या गावांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचना फलकावर तसेच संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आपले सरकार सेवा केंद्राकरीता अर्ज व आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सेतू विभागात सादर कराव्या लागणार आहेत. महाराष्ट्र शासनाने प्रसिध्द केलेल्या आपले सरकार सेवा केंद्राबाबतच्या १९ जानेवारी २०१८ च्या शासन निर्णयानुसार आपले सरकार सेवा केंद्राची नियुक्ती केली जाणार आहे. आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करणारा नागरिक हा त्या गावातील रहिवासी असणे आवश्यक आहे. आपले सरकार सेवा केंद्र हे केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अधिसुचित ठिकाणीच चालवणे क्रमप्राप्त आहे. केंद्राचे ठिकाण बदलण्यात आल्याचे निदर्शनास आल्यास, गंभीर स्वरुपाची चूक समजून, केंद्र रद्द करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. अगोदरपासून आपले सरकार सेवा केंद्र असेल त्यांचा अर्ज ग्राह्य धरता येणार नाही, ही अट टाकण्यात आली आहे. इच्छूक नागरिकांनी १० जून पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.