कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा शनिवार शेवटचा दिवस !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 02:41 PM2018-04-13T14:41:54+5:302018-04-13T14:41:54+5:30
वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना १४ एप्रिलपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत.
वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना १४ एप्रिलपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत. अर्ज करण्यासाठी शेवटचा दिवस असून, पात्र शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी केले.
दिड लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या हिस्स्याची संपूर्ण रक्कम भरण्याचा कालावधी ३० जून २०१८ पर्यंत आहे.
राज्य शासनाने १३ मार्च २०१८ रोजीच्या निर्णयानुसार कर्जमाफीस व एकवेळ समझोता योजनेस (वन टाईम सेटलमेंट) पात्र शेतकऱ्यांच्या थकीत रक्कमेवर १ ऑगस्ट २०१७ ते कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंतच्या कालावधीत व्याज आकारू नये, अशा सूचना सर्व बँकांना व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांना दिल्या आहेत. याऊपरही काही बँका व्याज आकारत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.
कर्जमाफी योजनेस पात्र असलेल्या ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आपले ऑनलाईन अर्ज सादर केलेले नाहीत, त्यांना १४ एप्रिल २०१८ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. तसेच शासनाच्या ७ डिसेंबर २०१७ च्या शासन निर्णयानुसार एकवेळ समझोता योजनेंतर्गत दीड लाख रुपयांवरील रक्कम भरण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०१८ पर्यंत देण्यात आली होती. ही मुदत ३० जून २०१८ पर्यंत वाढविण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक कटके यांनी केले आहे.
दरम्यान, ग्रामीण भागातील काही आपले सरकार सेवा केंद्रात नेट कनेक्टिव्हीटी नसल्याने शेतकऱ्यांना शहरी भागात अर्ज भरण्यासाठी यावे लागत आहे. कर्जमाफीच्या अर्जासाठी आता शेवटचा एक दिवस शिल्लक असल्याने शेतकरयांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन कटके यांनी केले.