शहिद जवान आकाश यांना हजारोंच्या उपस्थितीत अखेरचा निरोप, आसेगाव रोडवरील मैदानात अंत्य संस्कार
By नंदकिशोर नारे | Published: September 14, 2023 02:48 AM2023-09-14T02:48:22+5:302023-09-14T02:48:34+5:30
शहीद आकाश यांना अखेरचा निरोप देताना त्यांच्या आईचा, पत्नीचा व मुलीचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश बघून उपस्थित असलेला हजारोंचा जनसागर हेलावून गेला होता.
वाशिम : मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैनचे भूमीपुत्र तथा भारतीय सैन्यात ११ वर्षापासून कार्यरत असलेलले आकाश अढागळे लेहमध्ये तैनात होते. कर्तव्यावर असताना त्यांना वीरमरण आले. १३ सप्टेंबर रोजी शहीद आकाश यांचे पार्थिव शिरपूरला आणण्यात आले होते. त्यानंतर उशिरा रात्री १२:०२ वाजता त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्य संस्कार करण्यात आले. त्यांच्या पार्थिवाला त्यांचे मोठे बंधू नितीन व मुलगी तन्वी यांनी मुखाग्नी दिला.
शहीद आकाश यांना अखेरचा निरोप देताना त्यांच्या आईचा, पत्नीचा व मुलीचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश बघून उपस्थित असलेला हजारोंचा जनसागर हेलावून गेला होता.
शिरपूर येथील काकाराव अढागळे यांचा द्वितीय चिरंजीव आकाश हा २०११ मध्ये भारतीय सैन्यात भरती झाला होता. सैन्य दलात भरती होण्यापूर्वी आई, मोठा भाऊ नितीन स्वतः आकाश व धाकटा उमेश यांनी मोठे कष्ट केले. मोठ्या कष्टा नंतर प्रथम नितीन व नंतर आकाश हे दोघे भारतीय सैन्य दलात भरती झाले. तर काही वर्षांनी उमेश एम एस एफमध्ये भरती झाला. आकाशचा पाच वर्षांपूर्वी रुपाली हिच्यासोबत विवाह झाला होता. त्यांना चार वर्षाची तन्वी नामक मुलगीसुद्धा आहे.
लेह मध्ये तैनात असलेला ३२ वर्षीय आकाश अढागळे हे ८ सप्टेंबर रोजी एका अपघाती घटनेत पडल्याने जखमी झाले होते. यामध्ये त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर सैन्य दलाच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना १० सप्टेंबर रोजी दुपारी त्यांना वीरमरण आले. कायदेशीर सोपस्कार पार पाडल्यानंतर ११ सप्टेंबर रोजी आकाश यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. सोमवारी सायंकाळी त्याचे पार्थिव विमानाने नागपूर येथे आणण्यात आले होते. बुधवारी सकाळी पार्थिव लष्करी वाहनाने नागपूरहून मालेगांव येथे आणण्यात आले. मालेगाव येथूनच आकाश यांचे पार्थिव मोठ्या सन्मानाने शिरपूर येथे आणण्यासाठी हजारो युवा, गावकरी मालेगाव येथे उपस्थित झाले होते.
स्थानिक रिसोड फाटा परिसरा जवळ आकाश यांचे पार्थिव आणलेले भारतीय सैन्य दलाचे वाहन आल्याबरोबर उपस्थित युवक नागरिकांनी भारत माता की जय, आकाश आढागळे अमर रहे, अशा गगनभेदी घोषणा दिल्या. रिसोड फाटा परिसरातून हजारो युवा नागरिकांचा उपस्थितीत आकाश यांचे पार्थिव मिरवणूक मार्गाने त्यांच्या राहत्या घरी नेण्यात आले. या प्रसंगी रस्त्याचा दुतर्फांनी अंत्य दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. आकाशचे पार्थिव घरी पोहोचतात आई, पत्नी, व चार वर्षीय मुलगी पिऊ उर्फ तन्वी यांनी एकच आक्रोश केला. त्यांचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता. तेथे त्यांच्या पार्थिवाचे हजाराच्या संख्येत उपस्थित असलेल्या नागरिकांनी अंत्य दर्शन घेतले. काही वेळानंतर आकाशची अंत्य यात्रा काढण्यात आली. आकाश यांच्या पार्थिवावर आसेगाव रस्त्यावरील क्रीडांगणावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळेत हवेत बंदुकीचा फैरी झाडून त्यास मानवंदना देण्यात आली. या मैदानात जमलेल्या हजारोंच्या जनसागराने साश्रु नयनांनी शहीद जवान आकाश यांना अखेरचा निरोप दिला. प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार दीपक पुंडे, नायब तहसीलदार रविंद्र भाबड, मंडळाधिकारी रावसाहेब देशपांडे, तलाठी गवळी यांनी आकाश यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. आकाश यांच्या पश्चात आई, पत्नी चार वर्षीय मुलगी व दोन भाऊ असा परिवार आहे.
दरम्यान गावकऱ्यांच्या वतीने १२ सप्टेंबर रोजी रात्री स्थानिक विश्वकर्मा संस्थान मध्ये एक बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये शहीद आकाश अढागळे यांच्या कुटुंबासाठी सहाय्यता निधी इच्छुकां कडून जमा करण्यात आला. यात केवळ एका तासात जवळपास दोन लाखाचा सहायता निधीची ४० इच्छुकांकडून प्राप्त झाली.
शहीद आकाश अढागळे यांच्या सन्मानार्थ युवकाकडून जागोजागी मोठ्या प्रमाणात तिरंगा ध्वज लावण्यात लावण्यात आले. त्यामुळे परिसर तिरंगामय दिसून येत होता. तर विविध संघटना, संस्था,व्यापाऱ्यांनी ठिक ठिकाणी श्रद्धांजलीपर मोठ मोठे बॅनर लावले.
शहीद जवान आकाश यांना श्रद्धांजली व शेवटचा निरोप म्हणून शिरपूर येथील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. यासोबतच गावातील प्राथमिक शाळा, महाविद्यालयाला सुट्टी देण्यात आली होती
ठीक ठिकाणी पिण्याचे पाणी व चहाची व्यवस्था
शहीद जवान आकाश यांना शेवटचा निरोप देण्यासाठी हजारोंचा समुदायाने उपस्थिती लावली. बाजारपेठ बंद असल्याने किमान चहा व पाण्याचा व्यवस्था असावी म्हणून ग्रामपंचायत, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष त्यांनी ठीक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली.तर वैद्यकीय व्यवसाय व केमिस्ट संघटनेच्या वतीने चहाची व्यवस्था करण्यात आली होती.
शहीदांच्या परीजनांना शासनाच्या सोई-सुविधा मिळवून देण्यासाठी आणि विविध समाजसेवी संस्थांची मदत मिळवून देण्यासाठी एका समन्वय समितीचे गठण करण्यात आले. यामधे माजी सैनिक मुकंदराव देशमुख, नंदकिशोर देशमुख,संतोष भालेराव,अमित वाघमारे,गजानन देशमुख,कैलास भालेराव,डॉ.माणिक धूत,नंदू उल्हामाले,संतोष अढागळे ,संजय जाधव,असलम पठाण, विलास गावंडे व इतर सेवाभावी सभासदांचा या समितीत समावेश करण्यात आला.
आसेगाव रोडवरील ज्या मैदानात शहीदावर अंत्य संस्कार करण्यात आले.त्या मैदानाचे 'शहीद आकाश अढागळे क्रिडा संकुल' असे नामकरण करण्यात यावे आणि ग्रा पं मधील जयस्तंभाजवळ शहीद आकाश याचे स्मारक व्हावे, अशी आकाश यांच्या नातेवाईकांनी मागणी केली आहे.स्थानिक ग्रा पं याबाबत नेमका काय निर्णय घेते,याकडे सर्वांचे लक्ष लागून राहले आहे.