वाशिम जिल्ह्यात वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याची मोहिम अंतिम टप्प्यात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 03:08 PM2018-05-15T15:08:57+5:302018-05-15T15:08:57+5:30
वाशिम : वृक्ष लागवड अभियानांतर्गत जुलै महिन्यात जिल्ह्यात १३.८८ लाख वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्यासाठी खड्डे खोदण्याची मोहिम सुरू असून, आतापर्यंत जवळपास ८.३० लाख खड्डे खोदण्यात आले आहेत.
वाशिम : वृक्ष लागवड अभियानांतर्गत जुलै महिन्यात जिल्ह्यात १३.८८ लाख वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्यासाठी खड्डे खोदण्याची मोहिम सुरू असून, आतापर्यंत जवळपास ८.३० लाख खड्डे खोदण्यात आले आहेत.
पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी राज्यभरात वृक्ष लागवड मोहिम राबविली जात आहे. येत्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाणार आहे. सन २०१६ आणि २०१७ मध्ये जिल्ह्यात विविध प्रजातींचे जवळपास ५ लाख वृक्ष लागवड केली होती. येत्या १ ते ३१ जुलै या कालावधीतही १३.८८ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट वाशिम जिल्ह्याला देण्यात आले. कोणत्या विभागाने किती वृक्ष लागवड करावी याचे नियोजन केले असून, जबाबदारीही निश्चित केली आहे. जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींना ७.३८ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले. ऐनवेळी धावपळ नको म्हणून आतापासूनच वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदले जात आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाने खड्डे खोदण्याची जबाबदारी प्रत्येक विभागावर सोपविली असून, विहित मुदतीच्या आत खड्डे खोदून वृक्ष लागवडीसाठी सज्ज राहा, अशा सूचना दिलेल्या आहेत. यावर्षी पाणीटंचाई तिव्र स्वरुपात असल्याने आणि वृक्ष लागवडीसाठी जास्त उद्दिष्ट असल्याने अन्य जिल्ह्यातून रोपे आणण्याचे नियोजन प्रशासनाला करावे लागणार आहे. पाणीटंचाईचा फटका रोपवाटिकांना बसत असून, रोपे जगविण्याची कसरत करावी लागत आहे.