बदली झालेल्या शिक्षकांच्या प्रमाणपत्राची पडताळणी अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 01:57 PM2018-07-22T13:57:40+5:302018-07-22T14:00:07+5:30
वाशिम : आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बदलीसाठी सवलतीचा लाभ घेतलेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी विशेष पथकामार्फत केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बदलीसाठी सवलतीचा लाभ घेतलेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी विशेष पथकामार्फत केली जात आहे. ३१ जुलैपर्यंत ही पडताळणी पूर्ण करावयाची असून, सध्या सर्व कागदपत्रे गोळा करण्यात आली आहेत.
मे महिन्यात जिल्ह्यांतर्गत १४०२ तर आंतरजिल्हा बदली प्रक्रियेंतर्गत ५८ शिक्षकांच्या बदल्या झाल्या. मराठी माध्यमाच्या एकूण १३३१ जणांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या झाल्या असून, ऊर्दू माध्यमाच्या ७१ बदल्या झाल्या. मराठी माध्यमातील ३३ मुख्याध्यापक, २६२ पदवीधर शिक्षक, १०३६ सहायक शिक्षकांचा या बदलीमध्ये समावेश आहे तर ऊर्दू माध्यमातील एक मुख्याध्यापक, १७ पदवीधर शिक्षक व ५३ सहायक शिक्षकांचा समावेश आहे. कारंजा तालुक्यातील एकूण २५४, मालेगाव तालुक्यातील एकूण २५१, मानोरा तालुक्यातील एकूण १९५, मंगरूळपीर तालुक्यातील एकूण २०२, रिसोड तालुक्यातील एकूण १९० आणि वाशिम तालुक्यातील सर्वाधिक ३१० अशा एकूण १४०२ शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत आॅनलाईन पद्धतीने बदल्या झाल्या. यामध्ये एक ते चार संवर्गातील काही शिक्षकांनी बदलीसाठी विशिष्ट संवर्गाचे पुरावे सादर करून सवलतीचा लाभ घेतला. बदलीसाठी सवलतीचा लाभ घेतलेल्या एक ते चार संवर्गातील शिक्षकांनी सादर केलेल्या कागदपत्रांची १०० टक्के पडताळणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मीणा यांनी त्रिस्तरीय समिती गठीत केली आहे. या समितीमार्फत कागदपत्रांची तपासणी केली जात असून, काही शिक्षकांनीदेखील गटशिक्षणाधिकाºयांमार्फत शिक्षणाधिकाºयांकडे तक्रार केल्या आहेत. विशेषत: अपंग प्रमाणपत्रावर अनेकांचा संशय असून, त्या दृष्टिकोनातून या पथकातील आरोग्य अधिकाºयांमार्फत अपंग प्रमाणपत्राची तपासणी होणार आहे. त्यामुळे बोगस प्रमाणपत्र सादर करणाºया शिक्षकांचे धाबे दणाणले असून, कारवाई टाळण्यासाठी ‘गॉड फादर’मार्फत फिल्डिंग लावली जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
दरम्यान, कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर बोगस प्रमाणपत्र आढळून आल्यास कारवाईची दिशा निश्चित केली जाणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्ट केले.