स्व. गोपीनाथ मुंडे विमा योजना लागू करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:43 AM2021-05-08T04:43:42+5:302021-05-08T04:43:42+5:30
गेल्या एक वर्षापासून संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांची लॉकडाऊन आणि कोरोनामुळे प्रचंड दुर्दशा झालेली आहे. या वर्षी शेतमालाला थोडा चांगला भाव ...
गेल्या एक वर्षापासून संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांची लॉकडाऊन आणि कोरोनामुळे प्रचंड दुर्दशा झालेली आहे. या वर्षी शेतमालाला थोडा चांगला भाव असल्यामुळे दिलासा मिळाला, परंतु कोरोनाने पुन्हा थैमान घातले आहे. बहुतांश परिवारांमध्ये रुग्ण आढळायला लागले. शासन व प्रशासन पूर्णपणे हतबल झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आरोग्याच्या सोयींअभावी शेतकरी कुटुंबांतील कर्त्या लोकांच्या मृत्यूचे प्रमाण प्रचंड वाढत आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबाला आर्थिक आणि सामाजिक अशा दोन्ही हेळसांडीला सामोरे जावे लागते. बहुतांश शेतकरी परिस्थिती अभावी विमा घेत नाहीत. कुठलीच आर्थिक सुरक्षा कुटुंबाकडे राहात नाही. त्यामुळे शासनाने शेतकरी कुटुंबातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना ‘स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजने’चा लाभ देण्यासाठी तरतूद करावी. सदर बाबींमुळे रिसोडसह राज्यभरातील कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या हजारो शेतकरी कुटुंबांना थोडा आधार मिळेल. या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषिमंत्री दादाजी भुसे यांना भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आल्याचे विष्णुपंत भूतेकर यांनी सांगितले.