लेटलतिफ कर्मचारी ; अनेक विभागात खुर्च्या रिकाम्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 11:31 AM2020-07-28T11:31:01+5:302020-07-28T11:31:15+5:30
पंचायत समितीसह अन्य काही कार्यालयात काही कर्मचारी सकाळी १०.३० वाजेपर्यंतही आले नसल्याचा प्रकार उघडकीस आला.
- प्रफुल बानगावकर
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : पाच दिवसाचा आठवडा झाल्यापासून अधिकारी, कर्मचाऱ्यांची कामकाजाची वेळही बदलली आहे. शनिवार, रविवार असा दोन दिवस सुटीचा आनंद उपभोगल्यानंतर सोमवार, २७ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता कार्यालयात येणे अपेक्षीत असताना, येथील पंचायत समितीसह अन्य काही कार्यालयात काही कर्मचारी सकाळी १०.३० वाजेपर्यंतही आले नसल्याचा प्रकार उघडकीस आला.
अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातून पाच दिवस शासकीय कामकाजाचे दिवस आहे. त्यामुळे सकाळी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत शासकीय कामकाजाची वेळ ठरविण्यात आली. कारंजा पंचायत समिती येथे सकाळी ९.३० ते १०.१५ वाजतादरम्यान पाहणी केली असता विभागातील पशुसंवर्धन, कृषी, शिक्षण, बांधकाम, महिला व बालकल्याण, रोहयो कक्ष आदी विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत दाखल झाले नाही. आरोग्य विभाग सर्व व पंचायत विभागातील १ व शिक्षण विभागातील १ या प्रमाणे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यासंदर्भात गटविकास अधिकारी कालिदास तापी यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी भ्रमनध्वनीला प्रतिसाद दिला नसल्याने प्रतिक्रिया कळू शकली नाही.
तहसिल कार्यालयातील कर्मचारी वेळेवर
तहसिल कार्यालयातील सर्व कर्मचारी वेळेवर येत असल्याचे आढळून आले. नगर परिषद आस्थापन विभाग व अकाऊंट विभागातील काही कर्मचारी वेळेवर आले नसल्याचे दिसून आले. तसेच जन्म मृत्यृ नोंद विभागातील ३ कर्मचारी हजर तर २ कर्मचारी उपस्थित आढळून आले नाहीत.
कोरोना संसर्गाच्या काळात महसूल, आरोग्य, पोलीस व नगर परिषद विभागातील आरोग्य यत्रंणा दिवसरात्र एक करून काम करीत आहे. या तुलनेत ज्या शासकीय अधिकारी व कर्मचाºयांना काम कमी आहे ते कार्यालयात वेळेवर येत नसतील तर त्यांच्या वरिष्ठांकडून अहवाल मागवून योग्य ती कारवाई करण्यात येईल.
-राहुल जाधव,
उपविभागीय अधिकारी कारंजा