वाशिम जिल्ह्यात ‘कॅच द रेन’ मोहिमेला शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:14 PM2021-03-01T16:14:08+5:302021-03-01T16:14:30+5:30
Catch The Rain in Washim : १ मार्च रोजी जिल्ह्यात या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
वाशिम : प्रत्येकाने पाण्याचा एक थेंब वाचविण्याचा प्रयत्न करावा असा संदेश देण्यासाठी ‘कॅच द रेन’ मोहिम राबविण्यात येत असून, १ मार्च रोजी जिल्ह्यात या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
जलसंधारण मंत्रालय आणि युवा कार्यक्रम एव खेल मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरात सातशे जिल्ह्यामध्ये ‘कॅच द रेन’ (पाणी साठवा) ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालया निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्या हस्ते १ मार्च रोजी करण्यात आला. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत ही मोहिम सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील ५० गावाची निवड करण्यात येणार आहे. या मोहिम अंतर्गत गावातील सुमारे शंभर कुटुंबांना शेतात पडणारे तसेच गावाच्या परिसरात पडणारेपावसाचे पाणी साठविण्याबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा युवा अधिकारी सम्यक मेश्राम यांनी दिल. सुरूवातीला जिल्हास्तरीय ‘कॅच द रेन’ अभियानाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले आहे. यावेळी कॅच द रेन लोगोचे निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. यावेळी नेहरू युवा केंद्र जिल्हा युवा अधिकारी सम्यक मेश्राम, पाणी फाउंडेशन समन्वयक सुभाष नानवटे, वाशिम पाटबंधारे विभागाचे आर.डी.सांगळे, प्रविण पट्टेबहादूर, राजकुमार पडघान, केशव डाखोरे आदींची उपस्थिती होती.