दारू दुकान सुरू केल्यास गावबंदी!
By Admin | Published: July 6, 2017 01:18 AM2017-07-06T01:18:36+5:302017-07-06T01:18:36+5:30
अनसिंग : नव्याने दुकान सुरु झाल्यास गाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्धार केला, अशी माहिती सरपंच सिंधुताई विठ्ठल सातव यांनी बुधवारी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अनसिंग : जिल्ह्यातील बंद झालेली काही दारू दुकाने अनसिंग येथे सुरु करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दारू दुकानाला गावकऱ्यांसह महिलांनी तीव्र विरोध केला असून, नव्याने दुकान सुरु झाल्यास गाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्धार केला, अशी माहिती सरपंच सिंधुताई विठ्ठल सातव यांनी बुधवारी दिली.
वाशिम तालुक्यातील अनसिंग येथे अगोदरच दारूची अवैध विक्री होत आहे. यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असताना, आता आणखी तीन ते चार अधिकृत दुकाने अनसिंग येथे थाटण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
अगोदरच अनसिंग येथे देशी दारूचे एक दुकान आहे. जिल्ह्यातील बंद झालेली जवळपास तीन ते चार दुकाने अनसिंग गावात सुरू करण्याची माहिती महिलांना कळताच, बुधवारी तातडीची बैठक घेण्यात आली. यावेळी दारूच्या दुष्परिणामावर चर्चा झाली असून, गावात एकही दारूचे दुकान थाटू न देण्याचा निर्धार महिलांनी केला.
गावात भांडण तंटे निर्माण होऊ नये आणि गावाची शांततेतून समृद्धीकडे वाटचाल व्हावी, यासाठी दारूच्या दुकानाला महिलांचा विरोध आहे, असे सांगून दारूच्या नवीन दुकानाला परवानगी दिल्यास महिलांच्यावतीने गाव बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा सरपंच सिंधुताई सातव यांनी दिला.