बालकांसाठी न्यूमोकोकल क्वांजुगेट लसीकरणाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:45 AM2021-07-14T04:45:43+5:302021-07-14T04:45:43+5:30
वाशिम : एका वर्षाच्या आतील बालकांचे न्यूमोकोकल या जिवाणूमुळे होणाऱ्या न्यूमोनिया आणि मेनिनजायटिस या आजारापासून रक्षण करण्यासाठी न्यूमोकोकल ...
वाशिम : एका वर्षाच्या आतील बालकांचे न्यूमोकोकल या जिवाणूमुळे होणाऱ्या न्यूमोनिया आणि मेनिनजायटिस या आजारापासून रक्षण करण्यासाठी न्यूमोकोकल क्वांजुगेट लसीचा समावेश सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमात करण्यात आला आहे. जिल्ह्यात १२ जुलैपासून न्यूमोकोकल क्वांजुगेट लसीकरणाचा शुभारंभ झाला.
न्यूमोकोकल आजारामुळे बाधित बालकांना रुग्णालयात दाखल करावे लागू शकते किंवा काही बाधित बालकांचा मृत्यूदेखील होण्याची शक्यता असते. बॅक्टेरियल न्यूमोनिया हे पाच वर्षांखालील बालकांच्या मृत्यूच्या महत्त्वाच्या कारणांपैकी एक आहे. न्यूमोकोकल क्वांजुगेट वॅक्सिन अर्थात पीसीव्ही ही लस बालकांना होणाऱ्या तीव्र स्वरूपातील न्यूमोनियाचे प्रमुख कारण असलेल्या न्यूमोकोकल निमोनियापासून बालकांचे संरक्षण करण्याचे प्रभावी साधन आहे. जिल्ह्याला १२०० डोस प्राप्त झाले असून, पीसीव्ही लस ही अतिशय सुरक्षित आहे. इतर कोणत्याही लसीप्रमाणे ही लस दिल्यावर बालकाला सौम्य ताप येऊ शकतो किंवा इंजेक्शन टोचलेली जागा लालसर होऊ शकते. यामुळे घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. जिल्ह्यातील पात्र बालकांचे पीसीव्ही लसीकरण पालकांनी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी केले.
००००००००००
येथे मिळणार लस
ही लस विनामूल्य जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध आहे.
०००००
या बालकांना द्यावी लस
जिल्ह्याला या लसीचे १२०० डोस प्राप्त झाले आहेत. दीड महिन्याच्या बालकाचे, साडेतीन महिन्याच्या बालकाचे आणि नऊ महिन्याचे बालक असताना त्याला वेळापत्रकानुसार पीसीव्हीच्या मात्रा देऊन त्याचे लसीकरण करून घ्यावे. या लसीची एकही मात्रा चुकणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी केले.