वाशिम जिल्ह्यात वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 05:28 PM2018-07-01T17:28:33+5:302018-07-01T17:30:24+5:30
राज्यशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत १ जुलैपासून जिल्ह्यातही वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :सामाजिक वनिकरण, वनविभाग, प्रशासकीय कार्यालये, सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्थांनी १ जुलै रोजी जिल्ह्यात वृक्ष लागवड मोहिम राबविली. राज्यशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत १ जुलैपासून जिल्ह्यातही वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ झाला.
वाशिम जिल्ह्यात १ ते ३१ जुलै या कालावधीत १४.४४ लाख वृक्षांची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगर पंचायत, ग्रामपंचायतीसह वनविभाग व सामाजिक वनिकरणला शासनाकडून वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. १ जुलैपर्यंत उद्दिष्टाएवढे खड्डे संबंधित त्या-त्या विभागांनी खोदून ठेवले होते. गत तीन, चार दिवसांत पाऊस पडल्याने अनेक खड्ड्यांमध्ये पाणी साचले होते. पहिल्या दिवशी जिल्हाभरात जवळपास सव्वा लाख वृक्ष लागवड झाल्याचा दावा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय परिसर, पंचायत समिती, नगर परिषद, नगर पंचायत, स्थानिक स्वराज्य संस्थेसह खासगी शाळा, विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये यासह स्वयंसेवी संस्थांनी वृक्षारोपण मोहिमेत स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला. राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनीदेखील वृक्षारोपण मोहिमेत सहभाग नोंदवित वृक्षारोपण केले.