वाशिम जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांचा शुभारंभ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 06:00 PM2018-11-14T18:00:41+5:302018-11-14T18:00:55+5:30
सुजलाम, सुफलाम वाशिम अभियान : २८ जेसीबी मशिन उपलब्ध लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : राज्य शासनाचा जलसंधारण विभाग व ...
सुजलाम, सुफलाम वाशिम अभियान : २८ जेसीबी मशिन उपलब्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्य शासनाचा जलसंधारण विभाग व भारतीय जैन संघटना यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार भारतीय जैन संघटनेमार्फत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या सुजलाम, सुफलाम वाशिम अभियानांतर्गत १४ नोव्हेंबरला जलसंधारणाच्या विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला. ‘बीजेएस’ने पाच तालुक्यातील कामांसाठी सध्या २८ जेसीबी मशिन उपलब्ध करून दिल्या आहेत.
मागील काही वर्षापासून राज्याला मोठया प्रमाणात दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार व पाणी फांउडेशनच्या कामांमधून पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याचा दावा केला जात आहे. आता जलसंधारणाच्या कामाला गती देण्यासाठी भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा व जलसंधारण विभागाचे राज्य सचिव एकनाथ डवले यांच्या पुढाकाराने ‘सुजलाम सुफलाम वाशिम जिल्हा’ अभियान हाती घेतले आहे. या अभियानाचा तसेच प्रत्यक्ष कामाचाही शुभारंभ झाला आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या मार्गदर्शनात निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी वाशिम, मंगरूळपीर, मानोरा, मालेगाव व कारंजा तालुक्यातील गावांची नावे, जलसंधारणाची विविध कामे, उपलब्ध जेसीबी मशिन व संबंधित कर्मचारी, अधिकाºयांची जबाबदारी आदींचा निश्चित कार्यक्रम बुधवारी जाहिर केला. वाशिम तालुक्यात वनविभागाच्यावतीने सहा कामे असून, सहा मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या. कृषी विभागाच्यावतीने दोन गावे असून, ८ कामे आहेत. यासाठी ४ जेसीबी मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या. मंगरूळपीर तालुक्यातील तीन गावांत शेततळे व अन्य कामे असून, ४ मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या. मानोरा तालुक्यात तीन गावांतील जलसंधारणाच्या तीन कामांसाठी पाच मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या. मालेगाव तालुक्यात तीन गावांत सहा कामे असून, चार मशिन तर कारंजा तालुक्यातील दोन गावांतील जलसंधारणाच्या कामांसाठी पाच जेसीबी मशिन उपलब्ध करून देण्यात आल्या.