वाशिम येथे वन्यजीव सप्ताहाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 04:23 PM2018-10-01T16:23:36+5:302018-10-01T16:23:53+5:30
वन्यजीव सप्ताहाचा शुभारंभ जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते सोमवार, १ आॅक्टोबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: सर्वसामान्य नागरिकासोबतच नव्या पिढीत निसर्ग आणि वन्यजीव याबाबतची आस्था वाढविण्याच्या दृष्टिकोनातून वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने १ ते ७ आॅक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचा शुभारंभ जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते सोमवार, १ आॅक्टोबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आला.
यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे उपविभागीय अधिकारी के. आर. राठोड, वन विभागाचे सहाय्यक वन संरक्षक अशोक वायाळ, उत्तम फड, जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आर. एस. चंदनशिव, वन परिक्षेत्र अधिकारी संजय नांदुरकर, आकाश आहाळे आदी उपस्थित होते. वन्यजीव सप्ताहनिमित्ताने वन विभागाच्या वतीने विविध स्तरावर निबंध, चित्रकला व छायाचित्र स्पधेर्चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी वायाळ यांनी प्रस्ताविकात दिली.
यावेळी जिल्हाधिकारी मिश्रा म्हणाले, प्रत्येक वन्यजीव हा निसर्ग व पर्यावरणातील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे वन्यजीव रक्षणासाठी शासनाने विविध कायदे केले आहेत. या कायद्यांचे पालन करणे, ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची तरतूद असल्याचे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, वन्यजीव व वृक्षांच्या तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने पुढे येवून प्रयत्न करावेत. यावेळी उपस्थित असलेल्या विविध शाळांच्या विद्यार्थ्यांशी जिल्हाधिकारी मिश्रा यांनी संवाद साधला. राठोड, श्री. चंदनशिव यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. संचालन नांदुरकर यांनी केले, तर आभार फड यांनी मानले.