पोटनिवडणुकीत आघाड्यांचा लागणार कस !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:27 AM2021-07-02T04:27:54+5:302021-07-02T04:27:54+5:30
वाशिम : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत जनविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडीचा कस लागणार असून, पूर्वीच्या जागा टिकणार की ...
वाशिम : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत जनविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडीचा कस लागणार असून, पूर्वीच्या जागा टिकणार की यामध्ये घट, वाढ होणार याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण होत असल्याने, यासंदर्भात दाखल याचिका निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गातील आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाल्याचा मुद्दा समोर करून संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २७ गणांसाठी पोटनिवडणूक होत आहे. १४ सदस्यांची पदे रिक्त झालेल्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे सर्वाधिक चार सदस्य आहेत तर जिल्हा जनविकास आघाडीचे दोन सदस्य आहेत. जानेवारी २०२० मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राकाँला १२, काँग्रेस ९, वंचित बहुजन आघाडी ८, भाजप व जिल्हा जनविकास आघाडी प्रत्येकी सात, शिवसेना सहा व इतर तीन असे पक्षीय बलाबल होते. जिल्हा परिषदेत राकाँ, काँग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडीतील पक्षांनी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. आता पोटनिवडणूक होत असून महाविकास आघाडीचे अद्याप काही निश्चित नाही तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी, जिल्हा जनविकास आघाडी पुन्हा स्वबळावर लढण्यासाठी सज्ज झाली आहे. पूर्वीच्या चार जागा टिकविण्याचे आव्हान वंचित बहुजन आघाडीला तर दोन जागा टिकवून अधिक काही जागा पदरात पाडून घेण्याचे आव्हान जनविकास आघाडीला पेलावे लागणार आहे. दीड वर्षांच्या कालावधीत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने जानेवारी २०२० मधील समीकरणेही बदलली आहेत. बदललेली ही समीकरणे कुणाला तारणार आणि कुणाचा गेम करणार? याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.
०००
राकाँच्या लढतीकडे लक्ष !
१४ पैकी तीन पदे राकाँ सदस्यांची रद्द झाली आहेत. यामध्ये तत्कालीन जि.प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, तत्कालीन सभापती शोभा गावंडे यांचाही समावेश आहे. अध्यक्षपदाचा दावा टिकवून ठेवण्यासाठी राकाँला तीन जागा कायम ठेवण्याबरोबरच अन्य काही ठिकाणीदेखील उमेदवार कसे निवडून येतील, याची व्यूहरचनाही करावी लागणार आहे.
००००