पालेभाज्या महागल्या; लसूणचा दर २०० रुपयांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:35 AM2021-02-15T04:35:41+5:302021-02-15T04:35:41+5:30
वाशिमच्या बाजारात संपूर्ण जानेवारी महिना व फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या आठवड्यात पालेभाज्यांचे दर खालावले होते. दरम्यान, आवक कमी झाल्याने चालू आठवड्यात ...
वाशिमच्या बाजारात संपूर्ण जानेवारी महिना व फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या आठवड्यात पालेभाज्यांचे दर खालावले होते. दरम्यान, आवक कमी झाल्याने चालू आठवड्यात हे दर वाढले आहेत. रविवार, १४ फेब्रुवारी रोजी सकाळी वाशिम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या हरार्सीत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून पालेभाज्या महाग मिळाल्या. यामुळे भाजी विक्रेत्यांना अधिक दराने भाजीपाला मिळाला. तो खुल्या बाजारात आणखी काही प्रमाणात पैसे घेऊन दिवसभर विक्री करण्यात आला. कांदा, आले आणि बटाट्याचे दर वाढले आहेत. यासह लसूणच्या दरात प्रतिकिलो ४० रुपयांनी वाढ होऊन १८० ते २०० रुपये प्रतिकिलोने विक्री झाली. यासह आले १०० रुपये किलो, टोमॅटो २०, हिरवी मिर्ची ६०, दोडकी व भेंडी ६०, सिमला मिर्ची ७०, पत्ताकोबी ५०, फुलकोबी ६०, वांगी ५०, बरबटी व आवरा शेंग ६० रुपये किलो, तर मेथी आणि पालक १० रुपये जुडी याप्रमाणे विक्री झाली. (प्रतिनिधी)
तूरडाळीचे दर वाढले
किराणा साहित्याच्या दरामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. साखर, गूळ, खाद्यतेलाचे वाढलेले दर अद्याप कमी झालेले नाहीत. दुसरीकडे तुरीच्या डाळीमध्येही किलोमागे २० ते ३० रुपयांनी वाढ झाली आहे.
..........
फळांचे दरही वाढले
गत आठवड्यात वाशिमच्या बाजारपेठेत सफरचंद ५० ते ६० रुपये किलोने विकले गेले. द्राक्षाला १०० रुपये किलोचा दर मिळाला. चालू आठवड्यात या दरांमध्ये १० ते २० रुपयांनी वाढ झाली.
...........
लसूण महागला
कांदे आणि बटाट्याचे दर प्रतिकिलो ५० ते ६० रुपये आहेत; तर लसूणला आज १८० ते २०० रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला. गत आठवड्याच्या तुलनेने लसूणच्या दरात ४० रुपयांनी वाढ झाली.
.............
गेल्या काही आठवड्यांपासून पालेभाज्यांचे दर तुलनेने कमी असल्यामुळे दिलासा मिळाला होता; मात्र चालू आठवड्यात टोमॅटो, कोबी, भेंडी, सिमला मिर्ची यासह इतरही पालेभाज्यांचे दर वाढले आहेत. किराणा साहित्याचे दरही अधिक झाल्याने बजेट विस्कळीत होत आहे.
- चंदा येवतकर, गृहिणी
............
गत आठवड्याच्या तुलनेत चालू आठवड्यात पालेभाज्यांचे दर वाढलेले आहेत. मागील आठवड्यात कोबी ४० रुपये किलोने विकला गेला. आज मात्र कोबीला ६० रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला. हिरवी मिर्ची, सिमला मिर्चीचे दरही वाढले.
- बालाजी वानखेडे, भाजी विक्रेता
..................
सफरचंद, केळी, द्राक्ष या फळांचे दर चालू आठवड्यात वाढले आहेत. डाळिंब आणि पपईच्या दरात मात्र फारशी वाढ झालेली नाही. आज ग्राहकांची संख्याही तुलनेने कमीच राहिली.
- मुजीब बागवान, फळ विक्रेता