पालेभाज्या स्वस्त; कोबी, टोमॅटोचे दर वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:35 AM2021-02-08T04:35:50+5:302021-02-08T04:35:50+5:30

वाशिम : गेल्या काही दिवसांपासून पालक, मेथी, सांभार यासारख्या पालेभाज्या स्वस्त झाल्या आहेत. टोमॅटोचे दरही मध्यंतरी खालावले होते; मात्र ...

Leafy vegetables cheap; Prices of cabbage, tomatoes increased | पालेभाज्या स्वस्त; कोबी, टोमॅटोचे दर वाढले

पालेभाज्या स्वस्त; कोबी, टोमॅटोचे दर वाढले

Next

वाशिम : गेल्या काही दिवसांपासून पालक, मेथी, सांभार यासारख्या पालेभाज्या स्वस्त झाल्या आहेत. टोमॅटोचे दरही मध्यंतरी खालावले होते; मात्र चालू आठवड्यात कोबी, टोमॅटोचे दर वाढले असून, लसूण आणि लिंबूही महागले आहे.

गतवर्षी पर्जन्यमान चांगले राहिल्याने शेतशिवारांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. यासह सकाळ, सायंकाळच्या सुमारास गारवा आणि दिवसभर कडक ऊन असून, हे वातावरण पालेभाज्यांची उगवण क्षमता वाढविण्यास पोषक ठरत आहे. यामुळे पालेभाज्यांच्या उत्पादनात गेल्या काही आठवड्यांपासून वाढ झाली आहे.

रविवार, ७ फेब्रुवारी रोजी सकाळी वाशिम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या हर्रासीत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पालेभाज्या विक्रीसाठी आणल्या होत्या. आवक जास्त झाल्याने दर घसरले. यामुळे भाजी विक्रेत्यांना कमी दराने भाजीपाला मिळाला. तो काही प्रमाणात अधिक पैसे घेऊन दिवसभर बाजारात विक्री करण्यात आला. कांदा, आले आणि बटाट्याचे दर आज स्थिर असल्याचे दिसून आले; मात्र लसूणच्या दरात प्रतिकिलो २० रुपयांनी वाढ होऊन १५० ते १६० रुपये प्रतिकिलोने विक्री झाली. यासह आले ८० रुपये किलो, टोमॅटो २०, हिरवी मिर्ची ६०, दोडकी व भेंडी ४०, सिमला मिर्ची ६०, पत्ताकोबी ३०, फुलकोबी ३०, वांगी ४०, बरबटी व आवरा शेंग ४० रुपये किलो तर मेथी व पालक १० रुपये जुडीप्रमाणे विकण्यात आले.

.............................

तूरडाळीचे दर वाढले

किराणा साहित्याच्या दरामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. खाद्यतेलाचे वाढलेले दर अद्यापही कमी झालेले नाहीत. तर दुसरीकडे तुरीच्या डाळीमध्येही किलोमागे २० ते ३० रुपयांनी वाढ झाली आहे.

..................

फळांचे दर स्थिर

गत आठवड्यात वाशिमच्या बाजारपेठेत सफरचंद ५० ते ६० रुपये किलोने विकले गेले. द्राक्षाला १०० रुपये किलोचा दर मिळाला. चालू आठवड्यातही हे दर स्थिर असल्याचे दिसून आले.

......................

कोट :

गेल्या काही आठवड्यांपासून पालेभाज्यांचे दर तुलनेने कमी असल्यामुळे दिलासा मिळत आहे. चालू आठवड्यात टोमॅटो आणि कोबीचे दर मात्र वाढले आहेत. किराणा साहित्याचे दरही वधारल्याने बजेट विस्कळीत होत आहे.

- प्रमिला शिंदे, गृहिणी

......................

गत आठवड्याप्रमाणेच चालू आठवड्यातही पालेभाज्यांचे दर तुलनेने कमीच आहेत. त्यामुळे ग्राहकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. काही आठवड्यांपूर्वी ४० रुपयांवर पोहोचलेल्या टोमॅटोला मध्यंतरी १० रुपये किलोचा दर मिळाला. आता पुन्हा २० रुपये किलोचा दर मिळत आहे. मेथी, पालक आणि कोथिंबीरचे दर मात्र घसरले आहेत.

- आकाश वानखेडे, भाजी विक्रेता

................

डाळिंब आणि पपईच्या दरात फारशी वाढ झालेली नाही; मात्र सफरचंद, केळी, द्राक्ष ही फळे दूरवरून आणावी लागतात. कच्च्या स्वरूपातील या फळांना पिकवून त्यांची विक्री करावी लागत असल्याने दर वाढले आहेत. यामुळे ग्राहकांकडून त्यांच्या खरेदीला कमी प्रतिसाद मिळत आहे.

- मो. इरफान मो. सलमान, फळ विक्रेता

..................

कांदा स्वस्त, लसूण महाग

कांदे आणि बटाट्याचे दर प्रतिकिलो ४० ते ६० रुपयांवर आहेत; तर लसूणच्या दरात मात्र २० रुपयांची वाढ झाल्याचे रविवारच्या बाजारात दिसून आले. गत आठवड्यात १४० रुपये किलोने विकल्या गेलेल्या लसूणला चालू आठवड्यात मात्र किलोला १६० रुपये दर मिळाला. आल्याच्या दरातही वाढ झाली असून, ८० रुपये किलोने आल्याची विक्री झाली.

Web Title: Leafy vegetables cheap; Prices of cabbage, tomatoes increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.