भूमी अभिलेख कार्यालयाच्या छतातून गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:28 AM2021-07-15T04:28:20+5:302021-07-15T04:28:20+5:30
या ईमारतीचे काम निकृष्ट झाल्यामुळे इमारतीच्या छताला गळती लागली असून कार्यालयातील वस्तू खराब होत आहे. या इमारतीमध्ये शेती ...
या ईमारतीचे काम निकृष्ट झाल्यामुळे इमारतीच्या छताला गळती लागली असून कार्यालयातील वस्तू खराब होत आहे. या इमारतीमध्ये शेती मोजणीसाठी वापरण्यात येणारे १० लाख रुपये किमतीचे साहित्य आहे. कार्यालयात पाणी गळत असल्यामुळे अधिकाऱ्यांना कुठे ठेवावे हा प्रश्न निर्माण झाला आहे. या इमारतीमध्ये प्रिंटर, संगणक अशा वस्तू खराब झाल्या आहेत. यातच शेतीचे नकाशे, १९२५ वर्षाचे मूळ अभिलेख रेकॉर्ड आहे. सदर रेकॉर्ड पावसामुळे खराब होत असून शेतकऱ्यांना शेतीबाबतचे जुने रेकॉर्ड कसे उपलब्ध करून देता येतील हा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडत आहे. संबंधित कार्यालयाची दुरुस्ती देखभाल सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मागील तीन ते चार वर्षांपूर्वी करण्यात आली होती. सदर काम अत्यंत निकृष्ट केल्यामुळे इमारतीची दुरावस्था होऊन संपूर्ण कार्यालयात छताचे पाणी टपकत आहे. पावसामुळे कार्यालयातील छताचे पंखे बंद होत असून इमारतीच्या भिंतीमध्ये पाणी मुरत आहे. त्यामुळे विद्युत शाॅक लागून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच कार्यालयातील फरशी जमिनीच्या खाली गेल्यामुळे फर्निचरसुद्धा कुठे ठेवावे हा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत भूमी अभिलेख कार्यालयाकडून १३ जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला संबंधित कार्यालय दुरुस्ती करण्याबाबत पत्रव्यवहारसुद्धा करण्यात आला आहे.