लर्निंग लायसन्स ऑफलाईनच बरे; आरटीओ कार्यालयात पुन्हा गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:51 AM2021-07-07T04:51:17+5:302021-07-07T04:51:17+5:30
शिकाऊ परवान्यासाठी ऑनलाईन परीक्षा पद्धतीमध्ये परीक्षार्थीऐवजी तोतया उमेदवार अथवा इतरांमार्फत परीक्षा दिली जात आहे. त्यामुळे ही सर्व प्रक्रिया औपचारिकता ...
शिकाऊ परवान्यासाठी ऑनलाईन परीक्षा पद्धतीमध्ये परीक्षार्थीऐवजी तोतया उमेदवार अथवा इतरांमार्फत परीक्षा दिली जात आहे. त्यामुळे ही सर्व प्रक्रिया औपचारिकता उरेल, असे काहींचे म्हणणे आहे. शारीरिकदृष्ट्या सक्षम नसलेला किंवा मानसिकदृष्ट्या सक्षम नसलेला उमेदवार या प्रक्रियेतून विनासायास पुढे जाईल व अपघाताला बळी पडेल, असेही आरटीओ कार्यालयात आलेल्या काही उमेदवारांनी सांगितले. शहराच्या ठिकाणी अँड्राईड मोबाईल चालतो. परंतु ग्रामीण भागात अँड्राईड मोबाईल काय साधाही मोबाईल चालत नाही. कधी रेंज असते, तर कधी मोबाईल चार्जिंग झालेला नसतो. शिवाय मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक नसणे, अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्यामुळे लर्निंग लायसन्स अडकून बसून परीक्षा अर्धवटच राहाते. नाईलाजाने आरटीओ कार्यालयात जाऊन रांगेत उभे राहावे लागत आहे. कोरोना महामारीमुळे शासनाने ऑनलाईन लर्निंग लायसन्स काढण्याची सुविधा दिली आहे. परंतु, तांत्रिक बाबीमुळे आरटीओ कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत.
-------------------
बॉक्स: ऑनलाईनसाठी अडचणी काय?
१) कोरोनामुळे शासनाने लर्निंग लायन्स काढण्यासाठी घरबसल्या सुविधा दिली आहे. परंतु, यात तांत्रिक बाबींचे अडथळे येत आहेत. काही ठिकाणी अँड्राईड चालतो, तर काही ठिकाणी अँड्राईड मोबाईलला रेंजही मिळत नाही.
२) कधी तर लर्निंग लायसन्ससाठी परीक्षा देतेवेळेसच मोबाईल हँग होऊन बसतो, तर कधी अचानक चार्जिंग संपते. त्यातच मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक नसल्याने ओटीपी मिळत नाही.
३) काहींना तर लर्निंगसाठीची ऑनलाईन पद्धत समजत पण नाही. त्यामुळे आरटीओ कार्यालयात येण्याची वेळ येत आहे.
----------------
बॉक्स: उमेदवार वेगळा, ऑनलाईन परीक्षा देणारा दुसराच
ऑनलाईन प्रकारामुळे तोतयागिरी वाढली आहे. परीक्षा देणारा वेगळाच असतो आणि त्याला सांगणारा हा वेगळाच असतो. या अशा प्रकारामुळे पुढे चालून परीक्षार्थीला अपघातास सामोरे जाण्याची वेळ येणार आहे. लर्निंगमध्ये पास झाल्याचा आनंद मिळत असला तरी परमनंट लायसन्स काढतेवेळेस प्रश्नांची उत्तरे देताना जवळ कोणीही नसणार आहे.
--------------------
प्रतिक्रिया...
शासनाने ऑनलाईन सुरू केलेली लर्निंग लायसन्सची प्रक्रिया चांगली आहे. परंतु, काही उमेदवारांना यात अडचणी येत आहेत. ऑनलाईनची माहिती नसेल तर आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधून ती घ्यावी. लर्निंग अथवा परमनंट लायसनसह इतर कोणतीही अडचण आल्यास आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून माहिती घ्यावी.
-ज्ञानेश्वर हिरडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
----------------------
२५ टक्के ऑनलाईन
जिल्ह्यात १४ जूनपासून ऑनलाईन लर्निंग लायसनची प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाईन पद्धत समजत नाही म्हणून आतापर्यंत जवळपास ७० उमेदवार आरटीओ कार्यालयात आले होते. परीक्षा देतेवेळेस सर्व बाजू समजून घेऊन इतरांची मदत न घेता परीक्षा द्यावी. जेणेकरून भविष्यात वाहन चालविताना त्रास होणार नाही.
------------
किती लायसन्स दिले?
-२०१९- लर्निंग १७,०००
-परमनंट- ९,३००
-२०२०- लर्निंग १८,३००
-परमनंट ९,७००
-२०२१ लर्निंग ९,०००
-परमनंट ७,५००
---------------------
...म्हणून आरटीओ कार्यालय गाठले
लर्निंग लायसन्ससाठी शासनाने ऑनलाईन पद्धत सुरू केली आहे. ही पद्धत चांगली असली तरी तांत्रिक बाबी काही समजत नाहीत. परीक्षा देतेवेळेस मोबाईल हँग होत आहे. ऑनलाईन समजत नाही म्हणून तर आरटीओ कार्यालयात आलो.
-गौरव गायकवाड
-------------------
शासनाची लर्निंगसाठी ऑनलाईन पद्धत चांगली आहे. परंतु ग्रामीण भागात अँड्राईड मोबाईल चालत नाही. मोबाईल अँड्रॉईड असूनही तांत्रिक बाबी काही समजायला मार्ग नाही. ऑनलाईन पद्धत काय असते, हे समजून घेण्यासाठी आलो होतो. परंतु, साहेब भेटले नाहीत.
-अक्षय मोरे