बांधकाम कामगारांना घरासाठी मिळणार अनुदान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 05:42 PM2019-01-15T17:42:09+5:302019-01-15T17:42:49+5:30
वाशिम : अटल बांधकाम कामगार आवास योजनेंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना घर बांधकामासाठी १.५० लाख रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या सुचना कामगार विभागाने १४ जानेवारी रोजी जिल्हास्तरीय यंत्रणेला दिल्या आहेत.
वाशिम : अटल बांधकाम कामगार आवास योजनेंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना घर बांधकामासाठी १.५० लाख रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या सुचना कामगार विभागाने १४ जानेवारी रोजी जिल्हास्तरीय यंत्रणेला दिल्या आहेत.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार, कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (सक्रीय) बांधकाम कामगारांपैकी ग्रामीण भागातील नोंदीत बांधकाम कामगारांच्या घराच्या विभागाने १४ जानेवारीला मंजुरी दिली आहे. ग्रामीण भागात स्वत:च्या जागेवर नवीन घर बांधण्यासाठी किंवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रुपांतर करण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून १.५० लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. याकरिता संबंधीत पात्र कामगाराकडे कि मान २६९ चौ.फुट इतकी जागा असणे आवश्यक आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगाराने यापुर्वी कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा, घरकुलामध्ये स्वयंपाकगृह,बैठक हॉल, याबरोबरच स्रानगृह व शौचालय असणे आवश्यक आहे. लाभार्थी निवडीसाठी जिल्हास्तरीय निवड समिती गठीत केली जाणार आहे. यामध्ये अध्यक्ष म्हणुन अपर कामगार आयुक्त किंवा कामगार उपायुक्त राहणार आहेत. सदस्य म्हणुन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक,कामगार, कल्याणकारी मंंडळाचे जिल्हा कार्यकारी अधिकारी यांचा समावेश राहणार आहे. नोंदणीकृत बांधकाम, कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे जिल्हा कार्यकारी अधिकारी किंवा उपजिल्हा कार्यकारी अधिकारी कार्यालयाकडे विहीत नमुन्यात अर्ज सादर करावा लागणार आहे. या योजनेच्या संनियंत्रणासाठी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती गठीत केली जाणार आहे.
शासन निर्णयानुसार या योजनेचे वाशिम जिल्ह्यात सनियंत्रण केले जाईल.
दीपक कुमार मीना,
मुख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हा परिषद, वाशिम