बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 06:46 PM2021-01-19T18:46:06+5:302021-01-19T18:46:12+5:30
Leopard attacks farmer बिबट्याने शिंदे यांच्या डोक्याला चावा घेतला तसेच मान व दंडावर पंज्याने झडप मारून जखमी केले.
मानोरा : बिबट्याने चढविलेल्या हल्ल्यात ५५ वर्षीय शेतकरी जखमी झाल्याची घटना १८ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास मानोरा तालुक्यातील रोहणा शिवारात घडली.
तालुक्यातील रोहणा परिसरात वाघ, बिबट्या दिसल्याची चर्चा होती. परंतू, याकडे वनविभागाने दुर्लक्ष केले. १८ जानेवारी रोजी सुखदेव शिंदे हे सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास शेतात गस्तीसाठी जात होते. यावेळी त्यांच्यासोबत पाळीव कुत्राही होता. यावेळी अचानक बिबट्याने हल्ला चढविल्याने सुखदेव शिंदे भयभीत झाले. बिबट्याने शिंदे यांच्या डोक्याला चावा घेतला तसेच मान व दंडावर पंज्याने झडप मारून जखमी केले. मालकाच्या मदतीसाठी पाळीव कुत्रा धावून आला असता, बिबट्याने कुत्र्यावरही हल्ला चढविला. यामध्ये कुत्र्याचा मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या शिंदे यांना पुढील उपचारासाठी मानोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने प्रथमोपचार केल्यानंतर रुग्णाला अकोला हलविण्यात आले. याप्रकरणी नुकसानभरपाइ देण्याची मागणी शेकापचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत राठोड यांनी वनविभागाकडे १९ जानेवारी रोजी निवेदनाद्वारे केली.