सापळी-सोंडा शेलू शिवारात बिबट्याचा संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 05:35 PM2021-01-03T17:35:47+5:302021-01-03T17:36:35+5:30
Leopard News परिसरातील शेतकरी, शेतमजुरांसह ग्रामस्थांत भितीचे वातावरण पसरले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अनसिंग (वाशिम) : परिसरातील सापळी-सोंडा, शेलू शिवारात बिबट्याचा संचार असून, या बिबट्याने शनिवारी रात्री हरणाची शिकार केल्याचा प्रकार रविवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आला. त्यामुळे परिसरातील शेतकरी, शेतमजुरांसह ग्रामस्थांत भितीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने बिबट्याचा शोध घेऊन बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.
अनसिंग परिसरातील शिवारात गेल्या तीन आठवड्यांपासून बिबट्याचा संचार असल्याचे शेतकरी, शेतमजुरांकडून सांगण्यात येत आहे. या बिबट्याने यापूर्वी दोन तीन वेळा निलगाईची शिकार करून त्यांना फस्त केले. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर शेतात जाण्यास घाबरत आहेत. त्यातच शनिवार २ जानेवारी रोजी रात्री बिबट्याने हरणाची शिकार केल्याचे रविवारी सकाळच्या सुमारास शेतकºयांना दिसले. त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांत अधिकच भिती निर्माण झाली आहे. तथापि, वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाºयांनी अद्यापही शिवारात फिरून बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही किंवा शेतकरी, शेतमजुरांशी संवाद साधून माहिती घेत त्यांना आश्वस्तही केले नाही. यामुळे शेतकरी, शेतमजूर आता शेतात जाण्यास घाबरत आहेत. ही बाब लक्षात घेता वनविभागाने या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.