शिकारीसाठी लावलेल्या सापळ्यात अडकला बिबट्या; वनविभागाने बेशुद्ध करून घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 05:36 PM2022-02-04T17:36:10+5:302022-02-04T17:37:43+5:30
या बिबट्याला वनविभागाने बेशुद्ध करून अधिवासात सोडण्यासाठी ताब्यात घेतले.
वाशिम: वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी लावलेल्या सापळ्यात चक्क बिबटच अडकल्याचा प्रकार कारंजा तालुक्यात काकडशिवणी शिवारालगत शुक्रवारी उघडकीस आला. या बिबट्याला वनविभागाने बेशुद्ध करून अधिवासात सोडण्यासाठी ताब्यात घेतले.
कारंजा तालुक्यात प्रादेशिक जंगलाचे प्रमाण लक्षणीय आहे. याच तालुक्यात सोहळ काळविट अभयारण्यह असल्याने वन्यप्राण्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे या भागांत चोरीने वन्यप्राण्यांची शिकार करण्याचे प्रकारही होतात. वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठीच काहींनी गुरुवारी काकडशिवणी शिवारात लोखंडे सापळे लावले होते. या सापळ्यात चक्क बिबट्याच अडकला. सापळे लावून गेलेले शिकारी बिबट्यालाही घेऊन जाण्याच्या तयारीत होते, परंतु गावकऱ्यांना दिसल्याने त्यांनी पळ काढला. शेतकऱ्यांनी ही माहिती वनविभागाला दिल्यानंतर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, वन विभाग, पोलीस प्रशासनासह वनविभागाच्या आरसीबी पथकाने घटनास्थळी पोहोचत बिबट्याला बेशुद्ध करून अधिवासात सोडण्यासाठी ताब्यात घेतले. यावेळी सर्वधर्म आपत्कालीन शोध व बचाव पथक तसेच साळुंकाबाई राऊत महाविद्यालय वनोजा रासेयो आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक उपस्थित होते. बिबट्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी उसळी होती.