वाशिम जिल्ह्यातील शासकीय कापूस खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांची पाठ; १५ दिवसांत कापसाचे बोंडही नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 02:50 PM2017-11-11T14:50:53+5:302017-11-11T14:53:06+5:30
वाशिम: यंदाच्या हंगामात शेतकºयांकडून शासकीय दरात कापसाची खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात ३ ठिकाणी खरेदी केंद्र सुरु करण्यात आले; परंतु २५ आॅक्टोबरपासून सुरू झालेल्या या खरेदी केंद्रांवर अद्याप कापसाचे एकही बोंडाची खरेदी होऊ शकली नाही.
वाशिम: यंदाच्या हंगामात शेतकºयांकडून शासकीय दरात कापसाची खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात ३ ठिकाणी खरेदी केंद्र सुरु करण्यात आले; परंतु २५ आॅक्टोबरपासून सुरू झालेल्या या खरेदी केंद्रांवर अद्याप कापसाचे एकही बोंडाची खरेदी होऊ शकली नाही. खाजगी व्यापाºयांकडून शासनाच्या हमीदरापेक्षा अधिक भाव मिळत असल्याने शेतकºयांनी शासकीय खरेदी केंद्राकडे पाठ केल्याचे स्पष्ट होत आहे.
यंदा जिल्ह्यात ३५ हजार हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली होती. सुरुवातीला पावसाचे अल्प प्रमाण आणि किडींचा प्रादूर्भाव वगळता कपाशीला नंतर परतीच्या पावसाची चांगली साथ मिळाल्यानंतर जिल्ह्यात कपाशीचे उत्पादन बºयापैकी झाले. आता कपाशीचा पहिला वेचा पूर्ण झाला असून, खाजगी व्यापाºयांनी गत महिन्याच्या दुसºया आठवड्यापासूनच कपाशीची खरेदीही सुरू केली आहे. त्यामुळे शेतकरी कपाशीची विक्री करण्यासाठी येत आहेत. शासनाकडूनही यंदा २५ आॅक्टोबरपासून शासकीय खरेदी केंद्र उघडण्यात आली. त्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर, कारंजा आणि मानोरा येथील केंद्रांचा समावेश आहे. आता या खरेदी केंद्रांवर शेतकºयांकडून शासनाकडून जाहीर हमीदरानुसार कपाशीची खरेदी करण्यात येणार आहे; परंतु खाजगी व्यापाºयांकडून शासकीय दरापेक्षा अधिक दराने कपाशीची खरेदी करण्यात येत असल्याने शेतकरी व्यापाºयांकडेच धाव घेत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शासकीय खरेदी केंद्रांवर अद्याप किलोभरही कापसाची खरेदी होऊ शकली नाही. शासनाकडून जाहीर करण्यात आलेले अल्प हमीदर त्यास कारणीभूत असल्याचे दिसत आहे.