तूर, सोयाबीनच्या बियाण्यांकडे शेतकऱ्यांची पाठ

By admin | Published: June 13, 2017 01:17 AM2017-06-13T01:17:47+5:302017-06-13T01:17:47+5:30

घरच्या बियाण्यांवर भर : मूग, उडिदाची मागणी वाढली!

Lessons of farmers, soya bean seeds | तूर, सोयाबीनच्या बियाण्यांकडे शेतकऱ्यांची पाठ

तूर, सोयाबीनच्या बियाण्यांकडे शेतकऱ्यांची पाठ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि तुरीच्या बियाण्यांकडे पाठ फिरविली असून, या दोन्ही वाणांसाठी घरचे बियाणे वापरण्यावर अधिक भर असल्याचे दिसत आहे. मूग आणि उडिदाच्या बियाण्यांची मागणी वाढल्याची माहिती कृषी सेवा केंद्रांकडून प्राप्त होत आहे.
मागील वर्षी जिल्ह्यात ४ लाख २ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. त्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र २ लाख ८७ हजार ४३० हेक्टर, तुरीचे ६३ हजार ५०१ हेक्टर, मुगाचे १२ हजार ६०० हेक्टर, तर उडिदाचे १५ हजार २१७ हेक्टर होते. यंदाही तूर आणि सोयाबीनचा पेरा सर्वाधिक होणार असला, तरी त्याचे क्षेत्र घटणार असल्याचे बाजारातील स्थिती आणि कृषी विभागाच्या प्रस्तावित अहवालावरून स्पष्ट होते. मागील वर्षी सोयाबीन आणि तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले; परंतु या दोन्ही वाणांना अपेक्षेपेक्षा खूप कमी भाव मिळाल्याने हजारो शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंतही या वाणांची विक्री केली नाही. त्यामुळे या पिकांचे क्षेत्र कमी करून इतर पिकांचे क्षेत्र वाढविण्यावर शेतकऱ्यांचा कल दिसत आहे. त्यातच घरीच मोठ्या प्रमाणात सोयाबीन आणि तूर पडून असल्याने या वाणाचे बियाणे विकत घेण्यापेक्षा घरचे बियाणे वापरण्यावर शेतकऱ्यांचा भर दिसत आहे. कृषी सेवा केंद्रांकडून घेतलेल्या माहितीनुसार मागील वर्षीच्या तुलनेत सोयाबीन आणि तुरीच्या बियाण्यांची मागणी ५० टक्क्यांनी घटल्याचे सद्यस्थितीत स्पष्ट होत आहे. दरम्यान, मागील वर्षीपेक्षा यंदा बियाण्यांचे दर कमी झाल्याचे या संदर्भातील माहितीवरून स्पष्ट होत आहे. दरम्यान, सद्यस्थितीत बाजारात तुरीच्या बियाण्यांचे भाव ९० रुपये ते १५० रुपये प्रतिकिलो, सोयाबीन बियाण्यांचे भाव ४५ ते ५० रुपये प्रति ेिकलो आहेत. अशात घरचे बियाणे वापरणे शेतकऱ्यांना अधिक परवडणारे असल्याचे स्पष्ट होते. मुगाच्या बियाण्याचे दर ६० ते ७० रुपये प्रति किलो, तर उडीदा बियाण्यांचे दर १०० ते १५० रुपये प्रति किलो आहेत. कपाशीच्या बॅगचे दर ७५० रुपये असल्याचे कृषी सेवा केेंद्रधारकांकडून घेतलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून चांगला पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला वेग दिला असून, मालेगाव, वाशिम, रिसोड तालुक्यात पेरणी जोरात सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. कृषी विभागाच्या प्रस्तावित आकडेवारीत यंदा ४ लाख १३ हजार हेक्टवर क्षेत्रावर खरिपाची पेरणी होणार असून, यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत सोयाबीन, तुरीचे क्षेत्र घटून मूग आणि उडीद या पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. कृषीसेवा केंद्रांच्या माहितीनुसार कृषी विभागाची प्रस्तावित आकडेवारी खरी ठरणार असल्याचे दिसत आहे.

कृषी सेवा केंद्रावरील गर्दी वाढली!
यंदा शेतमालास अपेक्षित भाव मिळाले नसल्याने शेतकरी मोठ्या विंवचनेत सापडला होता. शेकडो शेतकऱ्यांनी अद्यापही तूर, सोयाबीनची विक्रीच केली नाही. त्यामुळे खरीप हंगामासाठी बियाणे, खते खरेदीबाबत शेतकऱ्यांचा फारसा उत्साह दिसत नव्हता. दरम्यान, शासनाच्या निर्णयापूर्वी बँकेकडून होत असलेला कर्जवसुलीचा तगादाही शेतकऱ्यांची चिंता वाढवित होता. त्यामुळे कृषीसेवा केंद्रांवर शुकशुकाटच दिसत होता. अशात मागील दोन-तीन दिवसांपासून पावसाचा तडाखा सुरु असतानाच शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांत उत्साह संचारला आणि कृषीसेवा केंद्रांवर सोमवारी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड उडाल्याचे दिसून आले.

Web Title: Lessons of farmers, soya bean seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.