खरीप पीक कर्जाकडे शेतकऱ्यांची पाठ!
By admin | Published: May 30, 2017 01:46 AM2017-05-30T01:46:30+5:302017-05-30T01:46:30+5:30
थकबाकीत रक्कम वळती होत असल्याचा परिणाम : २९ मे पर्यंत केवळ २३६ कोटींचे कर्ज वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : खरीप हंगाम म्हटला की जुने कर्ज अदा करायचे आणि नव्याने कर्ज घ्यायचे, अशी पद्धत पूर्वीपासून चालत आलेली आहे; परंतु यंदा आर्थिक अडचणीत सापडलेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी पीक कर्ज अदा केले नाही. यासह पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही नगण्य आहे. ११५० कोटी रुपये उद्दिष्ट असताना २९ मेपर्यंत केवळ २३६ कोटी रुपये कर्ज वाटप झाले आहे.
गतवर्षी जुलै २०१६ पर्यंत जिल्ह्यातील विविध बँकांनी शेतकऱ्यांना ८९० कोटी रुपयांचे कर्जवाटप केले होते. त्यापैकी यंदा केवळ २५० कोटी रुपयांच्या आसपास रक्कम वसूल झाली आहे. उर्वरित ६४० कोटी रुपये वसूल करणे बँकांना अशक्य होत असून, शेतकरीही शासनाकडून कर्जमाफी मिळेल, या अपेक्षेने रक्कम भरण्यास तयार नाहीत. तथापि, थकीत कर्ज भरल्याशिवाय नव्याने कर्ज मंजूर होत नाही, कर्ज मंजूर झाले तरी ती रक्कम जुन्या थकबाकीत वळती केली जात असल्याने शेतकऱ्यांनी बँकांच्या पायऱ्याच चढणे बंद केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील १.५ लाख शेतकऱ्यांना ११५० कोटी रुपये कर्ज वितरणाची तरतूद करण्यात आली आहे; मात्र खरीप हंगामातील पिकांची पेरणी प्रक्रिया अगदी जवळ येऊन ठेपली असताना आणि ३१ मे पर्यंत किमान ८० टक्के कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांना देण्यात आले असताना कर्ज घेण्यास शेतकरी तयार नसल्याने कर्ज वाटपाची टक्केवारी प्रचंड प्रमाणात घसरली आहे.
एकूणच जुनी थकबाकी वसूल होणे कठीण झाले असून, नव्याने कर्ज वाटप प्रक्रियेलाही खीळ बसल्यामुळे भविष्यात पीक कर्ज वाटप करणाऱ्या मध्यवर्ती बँकेसह इतर बँकांची आर्थिक स्थिती कमकुवत होणार असल्याची भीती जाणकारांमधून व्यक्त केली जात आहे.
दरवर्षी जून महिन्याच्या सुरुवातीलाच पाऊस सुरू होऊन पेरणीची कामे सुरू होत असल्याने ३१ मे पर्यंत निर्धारित पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टापैकी किमान ८० टक्के उद्दिष्ट गाठावे लागते. तशा प्रकारच्या सूचना जिल्ह्यातील संबंधित बँकांना यंदाही देण्यात आल्या आहेत; मात्र गतवर्षीच्या पीक कर्जाची रक्कम न भरण्यासोबतच शेतकऱ्यांनी नव्याने कर्ज उचलण्याकडेही पाठ फिरवल्याचे जाणवत आहे.
- ज्ञानेश्वर खाडे
जिल्हा उपनिबंधक, वाशिम.