बिया, धान्याद्वारे विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षणाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 03:41 PM2019-08-24T15:41:10+5:302019-08-24T15:41:58+5:30
कोकलगाव जिल्हा परिषद शाळेत बिया व धान्यापासून विद्यार्थ्यांना अंक व अक्षरे गिरविण्याचे धडे दिले जात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षण देण्यासाठी वाशिम तालुक्यातील कोकलगाव जिल्हा परिषद शाळेत बिया व धान्यापासून विद्यार्थ्यांना अंक व अक्षरे गिरविण्याचे धडे दिले जात आहेत.
खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळेत पुरेशा प्रमाणात भौतिक सुविधा उपलब्ध नसतात तसेच शैक्षणिक दर्जाही उच्च नसतो, अशी ओरड नेहमीच होते. याला जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा अपवाद ठरत असून, खासगी शाळांना लाजवेल, अशी कामगिरी जिल्हा परिषद शाळाही पार पाडत आहेत. वाशिम तालुक्यातील कोकलगाव जिल्हा परिषद शाळेत कृतीयुक्त शिक्षण पद्धतीवर भर देऊन विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबूत करण्याचा प्रयत्न शिक्षिका मिनाक्षी पांडुरंग नागराळे यांनी चालविला आहे. धान्य निवड व नवनिर्मिती करण्याची विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेता बिया व धान्याद्वारे अंक व अक्षरे काढण्याचे धडे विद्यार्थ्यांना दिले जात आहेत. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना बरबटीच्या बिया व अन्य धान्य देऊन शिकविलेले अंक, अक्षरे काढण्यास सांगितले जाते. विद्यार्थीदेखील तेवढ्याच सहजतेने अंक व अक्षरे काढतात. या कृतीयुक्त पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना चालना मिळते, कुतूहल वाढते, चूकलेल्या विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष देता येते, धान्य किंवा बियाद्वारे अंक किंवा अक्षरे काढल्यामुळे जास्त वेळ लागतो. त्यामुळे ते अक्षर सहज लक्षात राहते, विद्यार्थ्यांचा उत्साह अधिक वाढतो, विद्यार्थी क्रियाशील होतात, मुळाक्षरांचा सराव घेता येतो, असा दावा शिक्षिका मिनाक्षी नागराळे यांनी केला.