शालेय विद्यार्थ्यांना दिले शाडूचे गणपती तयार करण्याचे धडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 05:40 PM2018-08-28T17:40:47+5:302018-08-28T17:41:16+5:30
येथील युनिव्हर्सल व्हर्साटाईल सोसायटी (युवी) या सेवाभावी संस्थेद्वारा शहरातील आठ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शाडूचे गणपती तयार करण्याचे धडे दिले जात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ‘प्लास्टर आॅफ पॅरिस’पासून बनविण्यात येत असलेल्या गणेशमुर्ती सहजरित्या पाण्यात विरघळत नाहीत. याशिवाय यापासून जलप्रदुषणही निर्माण होते. ही बाब लक्षात घेवून संतुलित पर्यावरणासाठी गणेशमुर्ती शाडूच्या मातीपासून तयार होणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेवून येथील युनिव्हर्सल व्हर्साटाईल सोसायटी (युवी) या सेवाभावी संस्थेद्वारा शहरातील आठ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शाडूचे गणपती तयार करण्याचे धडे दिले जात आहेत. यामाध्यमातून गत दोन दिवसांत शिवाजी हायस्कुल व बाकलीवाल विद्यालयात झालेल्या कार्यशाळेत ३०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
पर्यावरण संरक्षणाचा विडा उचलेल्या संयुक्त राष्ट्र संघ (युनो) द्वारा मान्यताप्राप्त युनिव्हर्सल व्हर्साटाईल सोसायटी या सेवाभावी संस्थेद्वारा सातत्याने नवनवीन उपक्रम राबविले जातात. जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या सहकार्याने युवी सोसायटीच्या माध्यमातून वाशिममधील प्रमुख आठ शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्याची संमती मिळाली आहे. त्यापैकी शिवाजी हायस्कुल आणि बाकलीवाल विद्यालयात कार्यशाळा पार पडली. हा उपक्रम १३ सप्टेंबरपर्यंत चालणार असून लवकरच उर्वरित शाळांमध्येही कार्यशाळा होार आहे. एक हजार शाडूच्या मातीचे पर्यावरणपूरक गणपती वाशिम शहरातील विद्यार्थ्यांकडून तयार करण्याचा संस्थेचा संकल्प असून लवकरच तो पूर्ण होईल, अशी अपेक्षा संस्थाध्यक्ष सोळंके यांनी व्यक्त केली.