शेतकऱ्यांना पीक कर्ज न देण्याची कारणे लेखी स्वरूपात कळवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 06:30 PM2019-06-25T18:30:38+5:302019-06-25T18:30:45+5:30
ज्या बँकांनी शेतकºयांना पीक कर्ज दिले नाही, त्यांच्या शाखा व्यवस्थापकांनी यामागील कारणे लेखी स्वरूपात कळवावी, अशी तंबी जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात सन चालू वर्षीच्या खरीप हंगामात १ लाख ९३ हजार ८९० शेतकरी सभासदांना १५३० कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. त्या तुलनेत सद्या केवळ ३१ हजार १३६ शेतकरी सभासदांना २५७ कोटी ३१ लाख रुपये पीक कर्ज वाटप करण्यात आले. त्याची टक्केवारी जेमतेम १६.८२ आहे. तथापि, ज्या बँकांनी शेतकºयांना पीक कर्ज दिले नाही, त्यांच्या शाखा व्यवस्थापकांनी यामागील कारणे लेखी स्वरूपात कळवावी, अशी तंबी जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात पीक कर्ज वाटपाचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक विजय खंडरे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील कुठलाच शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही, याची बँकांनी दक्षता घेण्याचे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, शेतकºयांना खरीप हंगामासाठी कर्ज पुरवठा करणे हे बँकांचे महत्वाचे काम आहे; मात्र बँका याकामी सहकार्य करित नसल्याच्या शेतकºयांच्या तक्रारीत आहेत. ही बाब गंभीर असून संबंधित बँकांनी सामाजिक बांधीलकीतून शेतकºयांपर्यंत पोहचावे व पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. ज्या बँकांच्या शाखांनी पीक कर्ज वाटपात समाधानकारक कामगिरी केली नाही, त्यांच्या शाखा व्यवस्थापकांनी यापुढे दर सोमवारी त्यामागील कारणे लेखी स्वरूपात कळवावी, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
बँकांच्या ११७ शाखांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट!
जिल्ह्यात खरीप हंगामासाठी शेतकºयांना पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दीष्ट सोपविण्यात आलेल्या बँकांमध्ये अलाहाबाद बँक, बँक आॅफ बडोदा, बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक आॅफ इंडिया, इंडियन ओव्हरसीस बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक आॅफ इंडिया, सिंडिकेट बँक, युको बँक, युनियन बँक आॅफ इंडिया, अॅक्सीस, एचडीएफसी, आयसीआयसीआय, आयडीबीआय बँक, वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक, महाराष्ट्र आणि मध्यवर्ती सहकारी बँकांच्या एकूण ११७ शाखांचा समावेश आहे.