नवीन वर्षात चला पुण्याला; अमरावती-पुणे एक्स्प्रेसला तीन महिने मुदतवाढ
By दिनेश पठाडे | Published: December 25, 2023 04:31 PM2023-12-25T16:31:20+5:302023-12-25T16:33:01+5:30
अकोला-पूर्णा मार्गावरून धावणारी अमरावती-पुणे-अमरावती विशेष एक्स्प्रेसला आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
दिनेश पठाडे,वाशिम : अकोला-पूर्णा मार्गावरून धावणारी अमरावती-पुणे-अमरावती विशेष एक्स्प्रेसला आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे १ जानेवारी ते १ एप्रिलपर्यंत ही रेल्वे धावणार असल्याने नवीन वर्षात पर्यटनासाठी पुणे जाणाऱ्यांना प्रवाशांना स्वस्तात प्रवास करता येणार आहे.
३१ डिसेंबरपर्यंत धावणार असणारी गाडी क्रमांक ०१४३९ पुणे-अमरावती विशेष एक्स्प्रेसला १ जानेवारी ते ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. ही गाडी दर शुक्रवार आणि रविवारी पुणे स्थानकावरून रात्री १०:५० वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी दुपारी १२:५४ वाजता वाशिम स्थानकावर पोहोचून १ मिनिटाच्या थांब्यानंतर अमरावतीकडे मार्गस्थ होऊन प्रस्थान स्थानकावर सायंकाळी ५:३० वाजता पोहोचेल. १ जानेवारी २०२४ पर्यंत नियोजित असलेली गाडी क्रमांक ०१४४० अमरावती-पुणे एक्स्प्रेसला २ जानेवारी ते १ एप्रिल २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही रेल्वेगाडी अमरावती येथून दर सोमवार आणि शनिवारी सायंकाळी ७:५० वाजता निघून वाशिम येथे रात्री १०:२९ वाजता पोहोचेल. दुसऱ्या दिवशी दुपारी ४:२० वाजता पुणे स्थानकावर पोहोचेल.
पुणे-अमरावती-पुणे या द्विसाप्ताहिक एक्स्प्रेसला मुदतवाढ मिळाल्याने वाशिमकर प्रवाशांची सोय होणार आहे. या रेल्वेला उरुळी, केडगाव, दौंड, जिन्ती रोड, जेऊर, कुर्डूवाडी, बार्शी टाऊन, धाराशिव, लातूर, लातूर रोड, परळी वैजनाथ, परभणी, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा येथे थांबा असणार आहे.