विठूरायाच्या दर्शनाला जाऊया; यंदा थेट गावातूनच बस! आषाढी यात्रेसाठी एसटी ५ हजार विशेष बसेस सोडणार
By दिनेश पठाडे | Published: June 12, 2024 04:48 PM2024-06-12T16:48:08+5:302024-06-12T16:48:26+5:30
दरवर्षी श्री श्रेत्र पंढरपुर येथे आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक-प्रवाशी जातात. अनेक प्रवाशी स्वतःच्या खासगी वाहनाने, रेल्वे, एसटीने अथवा विविध पालखीं बरोबर चालत दिंडीने येतात. प्रवाशांना एसटीने यंदापासून थेट गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून दिली आहे.
वाशिम : पुढील महिन्यात आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्री क्षेत्र पंढरपुरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी एसटीने यात्राकाळात ५ हजार विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे.
दरवर्षी श्री श्रेत्र पंढरपुर येथे आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक-प्रवाशी जातात. अनेक प्रवाशी स्वतःच्या खासगी वाहनाने, रेल्वे, एसटीने अथवा विविध पालखीं बरोबर चालत दिंडीने येतात. प्रवाशांना एसटीने यंदापासून थेट गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. ४० पेक्षा जास्त भाविक प्रवाशांची संख्या असल्यास त्यांना त्यांच्या गावापासून विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. या प्रवासात देखील ७५ वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी ५० टक्के तिकीट दरात सुट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत. यात्रा काळामध्ये फुकट प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी एसटीने पंढरपूरला जाणाऱ्या विविध मार्गावर १२ ठिकाणी तपासणी नाके उभारण्याचे नियोजन केले आहे. एसटीचे २०० सुरक्षा कर्मचारी व अधिकारी यात्रा काळात २४ तास नजर ठेवून असणार आहेत.
चार तात्पूरर्ती बस स्थानके उभारणार
पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून गाड्या सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. याठिकाणी विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहेत.
गतवर्षी १८ लाख भाविकांचा एसटीने प्रवास
मागील वर्षी एसटीने आषाढी यात्रेनिमित्त ४२४५ विशेष बसेस सोडल्या होत्या. याव्दारे यात्रा काळामध्ये १८ लाख ३० हजार, ९३४ भाविक प्रवाशांची सुखरूप ने-आन एसटीने केली होती.
४० भाविकांचा ग्रुप बनवा; गावातच बस बोलवा
यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्या पेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.