विहिरींची पातळी खालावली, रबी पिके संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:36 AM2021-01-18T04:36:51+5:302021-01-18T04:36:51+5:30
गतवर्षीच्या पावसाळ्यात मुबलक पाऊस पडला, परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे उडीद, मूग ही पिके हातून गेली. तर कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंडअळीचा ...
गतवर्षीच्या पावसाळ्यात मुबलक पाऊस पडला, परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे उडीद, मूग ही पिके हातून गेली. तर कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना पुन्हा मोठा आर्थिक फटका बसला. त्यानंतर ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या पिकावर वाळवीचा प्रादुर्भाव झाल्याने या पिकाच्या उत्पादनात मोठी घट येऊन अनेक शेतकऱ्यांना या पिकावर केलेला खर्चसुध्दा वसूल झाला नाही. त्यामुळे उपलब्ध असलेल्या पाण्याचा आधार घेऊन खरीप हंगामातील नुकसान भरून काढण्यासाठी उंबर्डा बाजार परिसरातील शेतकऱ्यांनी कपाशीवर नांगर फिरवून, गहू , हरभरा आदी रबी पिकांची पेरणी केली. या पिकांसाठी शेतकऱ्यांनी वारेमाप पाणीउपसा केला. आता ही पिके एकदम जोमात आलेली असताना तापमानात वाढ होत असल्याने पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना गहू, हरभरा पिकांना पाणी देताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ऐन गव्हाची ओंबी आणि हरभरा पिकाचे घाटे भरण्याची वेळ आली असताना विहिरींची पाणीपातळी खोल गेल्याने रबी हंगामातील गहू, हरभरा पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.