त्याग वृत्तीमुळे व्यक्तीचे जीवनमान आनंदी -मुनीश्री श्री पद्मदर्शन विजयजी महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 03:55 PM2019-07-30T15:55:21+5:302019-07-30T15:55:27+5:30
प्रत्येकाने त्याग वृत्ती ठेवली पाहिजे, त्याग वृत्ती ठेवल्यामुळे व्यक्तीचे जीवनमान आनंदी राहते, असा उपदेश पद्मदर्शन विजयजी महाराज यांनी प्रवचनादरम्यान शिरपुर येथे उपस्थित भाविकांना दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपुर जैन (वाशिम) : गरजु गोरगरीबांची सेवा करुन त्यांना नेहमी मदत केली पाहिजे, आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या व गरजवंतांना आवश्यक असलेल्या सोयीसुविधा पुरवुन त्यांची सेवा करणे हा खरा धर्म आहे. प्रत्येकाने त्याग वृत्ती ठेवली पाहिजे, त्याग वृत्ती ठेवल्यामुळे व्यक्तीचे जीवनमान आनंदी राहते, असा उपदेश पद्मदर्शन विजयजी महाराज यांनी प्रवचनादरम्यान शिरपुर येथे उपस्थित भाविकांना दिला.
शिरपूर येथील पारसबाग येथे दिव्यप्रभावी श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ संस्थानच्यावतीने आयोजित चातुर्मासनिमित्त वाराणसी नगरीत ऐतिहासिक ५० दिवसीय चातुर्मास आराधना सुरू आहे. या धार्मिक सोहळयात मोठ्या संख्येत विविध राज्यातून ७०० भाविकांनी सहभाग घेतला आहे. याप्रसंगी पन्यास प्रवर श्री पद्मदर्शन विजयजी महाराज यांच्या अमृतमय वाणीतून ज्ञानगंगा वाहत आहे. यावेळी मुनिश्रींनी आपल्या उपदेशात त्यागवाद श्रेष्ठ आहे असे म्हटले. त्याग नसेल तर जीवनात अर्थ नाही. त्याग नसणाऱ्याचे जीवन पशुतुल्य असते. जीवनात अनेकदा अशा घटना घडतात की त्यावेळी मनुष्याला काय करावे व काय करु नये, अशी परिस्थीती निर्माण होते. जीवन एक संग्राम भूमि सारखे आहे. जीवनाच्या या संग्राम भूमिवर आपल्याला यशस्वी व्हावयाचे असल्यास त्यागाच्या मार्गावर चालने शिका. लालबहादूर शास्त्री, महात्मा गांधी, भगवान महावीर, प्रभु रामचंद्र, युधीष्ठीर आदींच्या जीवनाचा आदर्श अंगिकारल्यास निश्चितच दुस-यांसाठी आपले जीवन प्रेरणादायी ठरेल, असेही त्यांनी सांगितले. आपल्या प्रवचनातून पुढे बोलताना मुनीश्री पद्मदर्शन विजयजी महाराज यांनी आपल्या जवळ जास्त असणारे धन, सामान हे गरजवंत व गरिबांना द्या, त्यांना मदत करा, मंदिर, धर्मस्थान, धार्मिक स्थळ ठिकाण आदी ठिकाणी दानधर्र्म करण्याऐवजी जर आपण दीनदु:खी गोरगरीबांना सहाय्यता केली तर ते मोठे धर्म व पुण्याचे काम राहणार आहे. कारण दुस-याच्या प्रति सहानुभुती व मदतीची भावना ठेवणे हाच खरा मानव धर्म आहे, असे विजयजी महाराज म्हणाले. कार्यक्रमाला भाविकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.