शेतमजूर महिलांवर कोसळली वीज; एकीचा जागीच मृत्यू, १ गंभीर
By नंदकिशोर नारे | Published: September 21, 2023 05:19 PM2023-09-21T17:19:56+5:302023-09-21T17:22:23+5:30
अनसिंग येथील शेतकरी माणिक सातव यांच्या शेतातील सोयाबीन पिकात गुरुवारी २५ महिला निंदणाचे काम करीत होत्या.
नंदकिशोर नारे
वाशिम: सोयाबीनच्या पिकात निंदणाचे काम करीत असलेल्या दोन शेतमजूर महिलांच्या अगांवर वीज कोसळली. यात एक महिला जागीच ठार, तर दुसरी गंभीर जखमी झाली. ही घटना अनसिंग शिवारात गुरुवार २१ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. नफिसा परविन शेख रफिक (वय २८ वर्षे) असे मृतक महिलेचे, तर मनताज बी शेख सत्तार (वय ३५ वर्षे) असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे.
अनसिंग येथील शेतकरी माणिक सातव यांच्या शेतातील सोयाबीन पिकात गुरुवारी २५ महिला निंदणाचे काम करीत होत्या. अचानक दुपारच्या सुमारास ढगाळ वातावरण तयार झाले आणि १:३० वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. यावेळी नफिसा परविन शेख रफिक आणि मनताज बी शेख सत्तार या दोन महिलांच्या अंगावर वीज कोसळली. यात नफिसा परविन शेख रफिक या महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर मनताज बी शेख सत्तार ही महिला गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतक नफिसा परविन शेख रफिक यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे.
एका म्हशीचाही मृत्यू
माणिक सातव यांच्या शेतात सोयाबीनचे निंदण करीत असलेल्या नफिसा परविन शेख रफिक आणि मनताज बी शेख सत्तार दोन महिलांवर वीज कोसळली. त्यावेळी त्यांच्या बाजुलाच एका झाडाला म्हैसही बांधलेली होती. या म्हशीचा वीज पडल्याने मृत्यू झाला आहे.