महिला पोलिस पाटलांनी उध्वस्त केले गावठी दारूचे अड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 03:08 PM2020-04-19T15:08:10+5:302020-04-19T15:11:06+5:30
महिला पोलिस पाटलांनी उध्वस्त केले गावठी दारूचे अड्डे
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : बीट जमादारासोबत वारंवार संपर्क साधून अवैध दारूविक्री थांबविण्याची विनवणी करूनही फायदा न झाल्याने अखेर १८ एप्रिल रोजी महिला पोलिस पाटील संजीवनी राठोड यांनीच पुढाकार घेत दहा ठिकाणचे गावठी दारू अड्डे उध्वस्त करून आगळावेगळा पायंडा पाडला. याकामी त्यांना फुलउमरीच्या सरपंच, सदस्यांची साथ मिळाली. मानोरा तालुक्यातील फुल्उमरी परिसरात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या हातभट्टीची दारू विक्री केली जाते. गत काही दिवसांपासून संचारबंदी लागू असूनही अड्डयांवर मद्यपी दारू पिण्यासाठी गर्दी करतात. यामुळे इतर नागरिक व विशेषत: महिला त्रस्त झा ल्या आहेत. दरम्यान, हा प्रकार बंद करण्यासाठी फुलउमरीच्या बीट जमादारांना वेळोवेळी कारवाई करण्याबाबत सांगण्यात आले; मात्र त्याचा काहीच फायदा न झाल्याने अखेर पोलिस पाटील संजीवनी राठोड, सरपंच नंदा बाळू शेळके, उपसरपंच श्रावण कांबळे, ग्रामपंचायत सदस्य बाळू रामसिंग राठोड, आश्विनी उदयसिंग राठोड यांनी तब्बल १० ठिकाणी धाडी टाकून गावरान दारू व सडवा माल (किंमत ५० हजारांपेक्षा अधिक) नष्ट केला.
फुलउमरी येथे मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू तयार केली जाते. याबाबत वेळोवेळी बीट जमादारांना माहिती देऊन कारवाई करण्याची विनंती केली; मात्र त्याचा काहीच फायदा न झाल्याने अखेर मी व सरपंचांनी एकत्र येत दारू अड्डयांवर कारवाई केली.
- संजीवनी राठोड पोलीस पाटील, फुलउमरी, ता. मानोरा