दारु दुकानांचे परवाने वांध्यात!
By admin | Published: July 11, 2017 02:00 AM2017-07-11T02:00:21+5:302017-07-11T02:00:21+5:30
दुसऱ्या मोजणीतही अंतर कमीच : मान्यतेवर प्रश्नचिन्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : स्थानिक जय भवानी नगरच्या हद्दीत नव्याने सुरू झालेल्या वाइन शॉपीचे अंतर सोमवारी पुन्हा मोजण्यात आले. यावेळी पाचशे मीटरपेक्षा कमी अंतर भरल्याचे आढळून आले. त्यामुळे हा परवाना वांध्यात सापडणार, यात शंका नाही.
संबंधित दोन्ही दुकाने कायमस्वरुपी बंद करण्यात यावी व या दुकानांना परवाना देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली होती. राज्य उत्पादक शुल्काच्यावतीने राज्य महामार्गापासून पाचशे मीटरच्यावर किंवा त्यापेक्षा जास्त अंतरावरील जागेत देशी-विदेशी दारुचे दुकान सुरू करण्याचा परवाना देण्याचा नियम आहे. तथापि, राज्य उत्पादक शुल्क विभागाने संबंधित विभागाच्या साहाय्याने राज्य महामार्गापासून मोजणी करून संतोष श्रीराम जैस्वाल यांच्या वाइन शॉपचे अंतर ५०० मीटर असल्याचे तसेच सुभाष कनिराम राठोड यांचे देशी दारुचे दुकान ५०० मीटर असल्याचे दाखवून त्यांना परवाना दिला. यावर परिसरातील नागरिकांनी आक्षेप घेतला असता, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सायकल यंत्राने अंतर मोजण्यात आले. त्यावेळी सदर अंतर ४९८ मीटर असल्याचे निष्पन्न झाले होते. यावरही हा गुंता कायम होता. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी राज्य महामार्गापासून सदरचे अंतर मोजण्यासाठी एक समिती गठित केली होती. या समितीने प्रत्यक्ष अंतर मोजले असता, देशी दारुचे दुकान ४९०.७५ मीटर तर वाइन शॉप ४९३.५० मीटर एवढे आढळून आले. हा अहवाल समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे.
आता जिल्हाधिकारी याबाबत काय निर्णय घेतात व दोषी अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याप्रसंगी सतीश वानखेडे (गल्लाभाऊ), किरण सोमाणी, नियोजन सभापती अमित मानकर, गजानन खटके, गजानन ठेंगडे, माजी नगरसेवक भीमकुमार जीवनानी, नीलेश जैस्वाल, उमेश मुंदडा, विजय रंगभाळ, राजू दिग्रसकर, किशोर पेंढारकर, रवि पेंढारकर, पवन पेंढारकर, पिंटू रोकडे, चंदू चव्हाण, गणेश ठेंगडे, अजय भालेराव, तनवीर खान, रवी दिग्रसकर, नितीन पेंढारकर, गजानन दिग्रसकर आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.