दुकान फोडून लाखो रुपयांची विदेशी दारू लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 11:01 AM2020-04-06T11:01:59+5:302020-04-06T11:02:11+5:30
वाईन बारची शटर तोडुन अज्ञात चोरट्यांनी (तळीरामांनी) लाखो रूपयांची विदेशी दारू लंपास केल्याची घटना ५ एप्रिल रोजी उघडकीस आली.
लोकमत न्युज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणुची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण देश ‘लॉक डाऊन’ आहे. संचारबंदी असल्याने शहरातील मद्यविक्रिची दुकाने, बियरबार व हॉटेल्स बंद आहेत. तळीरामांना दारू भेटत नसल्यामुळे दारूचा साठा असलेली दुकाने फोडण्याचा प्रताप नुकताच चिखली (जि.बुलडाणा) येथे घडला होता. नेमकी या घटनेची पुनरावृत्ती वाशिम शहरात घडली. शहरातील हिंगोली नाका परिसरात असलेल्या सम्राट वाईन बारची शटर तोडुन अज्ञात चोरट्यांनी (तळीरामांनी) लाखो रूपयांची विदेशी दारू लंपास केल्याची घटना ५ एप्रिल रोजी उघडकीस आली.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभुमीवर जमावबंदीपासुन दारूची दुकाने, बार रेस्टॉरंट बंद आहेत. यामुळे तळीरामांना दारू मिळेनाशी झाली आहे. तळीरामांनी दारूचा साठा असलेली ठिकाणे शोधुन त्याठिकाणी चोरी करण्याचे धाडस करीत असल्याचे समोर येत आहे.
लॉकडाऊन जाहिर झाल्यापासुन सम्राट वाईन बार हे प्रतिष्ठण बंद आहे. या भागात तुरळक दुकाने असल्याने नेहमीच शुकशुकाट असतो. नेमका या शुकशुकाटीचा फायदा घेत तळीरामांनी शटर वाकवून बारमध्ये प्रवेश केल्यानंतर विविध कंपनीच्या मद्याच्या बाटल्या लंपास केल्या. विशेष म्हणजे बार मधील सीसी कॅमेऱ्याचा डीव्हीआरही तळीरामांनी लंपास केला. या तळीरामांनी केलेल्या चोरीत नेमका किती लाखांचा मद्यसाठा लंपास झाला आहे याची निश्चित आकडेवारी समोर आली नसली तरी हा साठा चार ते पाच लाखांच्या घरात असल्याची प्राथमिक माहिती आहे. पुढील तपास वाशिम शहर पोलीस करीत आहेत.