प्रलंबित फाइल्सची यादी फलकावर लावा!

By Admin | Published: March 4, 2017 02:02 AM2017-03-04T02:02:16+5:302017-03-04T02:02:16+5:30

मुख्य कार्यकारी अधिका-यांचे निर्देश; स्थायी समितीच्या सभेत विविध मुद्यांवर चर्चा.

List pending files on the list! | प्रलंबित फाइल्सची यादी फलकावर लावा!

प्रलंबित फाइल्सची यादी फलकावर लावा!

googlenewsNext

वाशिम, दि. ३-या ना त्या कारणाहून नेहमीच चर्चेत राहणार्‍या वित्त विभागात सुसूत्रता आणणे आणि गैरसमज दूर करण्याच्या दृष्टिकोनातून यापुढे प्रलंबित फाइल्स्ची यादी वित्त विभागाच्या फलकावर लावण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी दिले. यासंदर्भात स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी प्रश्नांचा भडीमार केल्यानंतर पाटील यांनी उपरोक्त निर्देश दिले.
जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात शुक्रवारी दुपारी २ वाजता सुरू झालेल्या स्थायी समितीच्या पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख, तर व्यासपीठावर उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्‍वनाथ सानप, शिक्षण व आरोग्य सभापती सुधीर पाटील गोळे, समाजकल्याण सभापती पानुताई दिलीप जाधव, महिला व बालकल्याण सभापती यमुना जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के.एम. अहमद आदींची उपस्थिती होती. विविध विभागाच्या फाइल्स् वित्त विभागात प्रलंबित राहतात, निर्धारित वेळेपेक्षाही अधिक काळ त्या फाइल तशाच पडून राहतात, असा आरोप सदस्यांनी केला. यासोबतच काही कर्मचारीदेखील वित्त विभागात फाइल पडून आहे, असे सांगतात हा मुद्दा सभेत चर्चेत आला. यावर मुख्य लेखा व वित्त अधिकारी येवले यांनी प्रलंबित फाइल्स्चा अहवाल दर आठवड्याला मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना देत असतो, असे सांगितले. यापुढे कामकाजात सुसूत्रता यावी. तसेच कुणाचा गैरसमज होऊ नये म्हणून दर आठवड्यात प्राप्त होणार्‍या फाइल आणि प्रलंबित फाइल याचा लेखाजोखा एका फलकावर (बोर्ड) लावावा, असे स्पष्ट निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी दिले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र ताथोड यांनी समाजकल्याण विभागाशी संबंधित काही प्रश्न उपस्थित केले. सभेला समाजकल्याण अधिकारी गैरहजर असल्याने कुणाला जाब विचारावा, असा मुद्दाही सदस्यांनी उपस्थित केला. तसेच राज्याच्या समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त हेदेखील गत एका वर्षापासून सभेला उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे तांडा वस्ती सुधार योजनेवर चर्चा करता येत नाही, असे सदस्यांनी पीठासीन अधिकार्‍यांच्या निदर्शनात आणून दिले. गैरहजर अधिकार्‍यांविरूद्ध कारवाईचा प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी केल्या.
उंबर्डा बाजार येथील जिल्हा परिषद शाळेची शिकस्त झालेली इमारत संबंधित मुख्याध्यापकांनी वरिष्ठांची लेखी परवानगी व आवश्यक ते प्रशासकीय सोपस्कार न करताच परस्पर पाडली कशी, असा प्रश्न जिल्हा परिषद सदस्य उस्मान गारवे यांनी उपस्थित केला. यावर संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळणार्‍यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन प्राथमिक शिक्षणाधिकारी दिनकर जुमनाके यांनी दिले.
कारंजा येथील गटशिक्षणाधिकार्‍यांनी गतवर्षी परस्पर बदली कशी केली, शिवनगर येथून किन्ही रोकडे येथे एका शिक्षकाची बदली कोणत्या अधिकारात केली, असा प्रश्नही गारवे यांनी उपस्थित केला. या प्रकरणाचीदेखील चौकशी केली जाईल, अशी ग्वाही जुमनाके यांनी दिली. बदली केल्यानंतरही गटशिक्षणाधिकार्‍यांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनात का आणून दिली नाही, या प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळल्यास एफआयआर दाखल करा, अशा सूचना गणेश पाटील यांनी केल्या.

Web Title: List pending files on the list!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.