आठ महिने उलटूनही विसावी पशुगणना अधांतरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 03:14 PM2019-10-02T15:14:12+5:302019-10-02T15:14:19+5:30
राज्यात विविध स्वरूपातील जनावरे नेमकी किती, याबाबत माहिती मिळणे अवघड झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : आधीच एक वर्ष विलंबाने अर्थात जानेवारी २०१९ पासून राज्यभरात सुरू झालेल्या विसाव्या पशुगणनेचे काम विविध स्वरूपातील आठ महिन्यानंतरही अधांतरी लटकले आहे. यामुळे राज्यात विविध स्वरूपातील जनावरे नेमकी किती, याबाबत माहिती मिळणे अवघड झाले आहे.
राज्यात दुभते, भाकड जनावरांची संख्या नेमकी किती आहे, कोणत्या वंशाच्या जनावरांचे प्रमाण कमी होत आहे, याबाबत जाणून घेऊन त्याआधारे पशुसंवर्धनासाठी योजनांचे नियोजन करता येणे शक्य असते. त्यासाठी दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते. त्यानुसार, १९ वी पशुगणना २०१२ मध्ये झाली होती. त्यानंतरही ती २०१७ मध्ये होणे क्रमप्राप्त होते; मात्र
टॅब खरेदीतील गोंधळासह अन्य स्वरूपातील अडचणी व शासकीय उदासिनतेमुळे २० वी पशुगणना विलंबाने जानेवारी २०१९ पासून सुरू करण्यात आली. त्यासाठी राज्यभरातील जिल्ह्यांमध्ये ठराविक प्रगणक नेमून त्यांना टॅब पुरविण्यात आले. यामाध्यमातून गोळा होणारी दैनंदिन माहिती साठविण्याकरिता दिल्लीत मुख्य सर्व्हरची व्यवस्था करण्यात आली; परंतु सर्व्हर डाऊन राहणे, दुर्गम भागात इंटरनेटची गती कमी असणे यासह इतर अडचणींमुळे आॅक्टोबर महिना उजाडूनही पशुगणनेचा घोळ अद्यापपर्यंत संपुष्टात आलेला नाही.
प्रगणकांकडून पशुधनासंबंधी गोळा करण्यात आलेली माहिती टॅबव्दारे मुख्य सर्व्हरकडे पाठविण्यात आली आहे. यासह पशुधन असलेल्या घरांची पुर्नसर्वेक्षण प्रक्रिया देखील पार पडली आहे. आता शासनस्तरावरूनच पशुधनाचा आकडा जाहीर होईल.
- गणेश पवार
पशुधन विकास अधिकारी, वाशिम