स्थानिक स्वराज्य संस्थांची सार्वत्रिक कर वसूली अपुर्णच
By admin | Published: June 15, 2017 07:30 PM2017-06-15T19:30:50+5:302017-06-15T19:30:50+5:30
वाशिम जिल्ह्यातील वास्तव: पाणीकराची ७० टक्के वसुली थकित
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: शासनाने कर वसुलीसाठी मुदत वाढवून दिल्यानंतरही वाशिम जिल्ह्यातील नगर पालीका व नगर पंचायती अंतर्गत मालमत्ता व पाणीपट्टी करासह सार्वत्रिक कर वसुली अद्यापही अपुर्णच आहे. शासनाने १ एप्रिल ते ३१ मार्च या आर्थिक वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांना कर वसुलीसाठी ३० जून अखेरपर्यंत मुदत वाढ दिल्यानंतर ही पाणीपट्टी कराची तब्बल ७० टक्के, तर मालमत्ता कराची २० टक्के वसूली बाकी आहे.
वाशिम जिल्ह्यात वाशिम, कारंजा,मंगरुळपीर, रिसोड या चार नगर पालीका तसेच मालेगाव मालोरा या नगरपंचायती असून सदर नगरपंचायती व नगर पालीकांअंतर्गत पाणीपट्टी करा पोटी मागील थकबाकी व नविन कर मिळून सहा कोटी १६ लाख ७४ हजार रुपये वसूल करायचे होते मात्र सदर पाणी करा पोटी आतापर्यंत म्हणजेच ३० मे अखेरपर्यंत केवळ ९२ लाख ९७ हजार १५८ रुपये वसूल करण्यात आले आहे. सदरची पाणी पट्टीची वसुली ही फक्त २९.७६ टक्के एवढी असून ७० टक्क्यांच्यावर पाणीकर वसूली अपूर्ण आहे. मालमत्ता करापोटी मागील थकबाकी व नविन आकारणी मिळून १८ कोटी ३४ लाख ३७ हजार ६१२ पैकी १४ कोटी ४५ लाख ३३ हजार ४४० एवढी कर म्हणजेच ८० टकके कर वसूली झाली असून मालमत्ता करापोटी फक्त २० टक्के वसूली बाकी आहे.