संयुक्त राष्ट्र पर्यावरणाच्या नियमन मंडळात वाशिमच्या 'युवी' सोसायटीला स्थान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 08:40 AM2017-12-14T08:40:00+5:302017-12-14T08:44:01+5:30
वाशिमच्या युनिव्हर्सल व्हर्सटाईल सोसायटीस (युवी) संयुक्त राष्ट्र पर्यावरण नियमन मंडळाचा निरीक्षक हा अमूल्य दर्जा मिळाला असून त्या संदर्भात अधिकृत पत्र संस्थेस प्राप्त झाले, अशी माहिती संस्थाध्यक्ष नारायण सोळंके यांनी बुधवारी 'लोकमत'ला दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - वाशिमच्या युनिव्हर्सल व्हर्सटाईल सोसायटीस (युवी) संयुक्त राष्ट्र पर्यावरण नियमन मंडळाचा निरीक्षक हा अमूल्य दर्जा मिळाला असून त्या संदर्भात अधिकृत पत्र संस्थेस प्राप्त झाले, अशी माहिती संस्थाध्यक्ष नारायण सोळंके यांनी बुधवार, १३ डिसेंबर रोजी दिली. हा बहुमान मिळविणारी युवी सोसायटी ७ राज्यात असलेली सोळावी संस्था ठरली आहे.
पर्यावरणाशी संलग्नित जागतिक स्तरावरील निर्णय घेण्यासाठी संयुक्त राष्ट्र पर्यावरण विभाग १९३ देशांच्या सहकर्याने कार्यरत आहे. पर्यावरण विधानसभेत ११८ स्थायी प्रतिनिधींची समिती, विविध राष्ट्रांचे १९३ पर्यावरण मंत्री, यासह नऊ प्रमुख गट आणि भागधारक आहेत. भागधारकांमध्ये शेतकरी, महिला, वैज्ञानिक आणि तांत्रिक समुदाय, मुले आणि युवा, स्थानिक लोक आणि त्यांचे समुदाय, कामगार आणि कामगार संघटना, व्यवसाय आणि उद्योग, गैर-सरकारी संस्था, स्थानिक अधिकारी यांचा समावेश असतो. संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणविषयक कार्यामध्ये प्रमुख गट आणि हितधारकांचा सहभाग महत्वपूर्ण मनाला जातो. यात पर्यावरण संदर्भात उल्लेखनीय कार्य करणाºया गैर-सरकारी संस्था गटात वाशिमच्या युवी सोसायटीस मान्यता मिळाली आहे. भविष्यात सर्व सार्वजनिक बैठका, संयुक्त राष्ट्रे पर्यावरण सभा, स्थायी प्रतिनिधींची समिती व सत्रांकरिता युवी सोसायटी निरीक्षक म्हणून आमंत्रणे प्राप्त करेल. पर्यावरण संसदेच्या सत्रादरम्यान, पर्यवेक्षक म्हणून पूर्ण चर्चासत्रास उपस्थित राहण्यासाठी आणि सरकारी प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी, यूएन पर्यावरण सचिवालयद्वारे माहिती दस्तऐवज स्वरूपात सरकारला लिखित वक्तव्य प्रक्षेपित करण्यासाठी, संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण सभेच्या चर्चेदरम्यान तोंडी वक्तव्य करण्यासाठी संस्थेस कायमस्वरूपी मान्यता राहणार आहे. वाशिमच्या स्थानिकांचा वाटा आता पर्यावरणाशी संलग्नित जागतिक निर्णय प्रणालीत होणार असल्याचा अभिमान वाटतो, असे युवी सोसायटीचे अध्यक्ष नारायण सोळंके यांनी सांगितले.
२००५ पासून कार्यरत असलेल्या नागठाणा स्थित युवी सोसायटीने शिक्षण, ग्रामविकास व पर्यावरणात आपले भरीव योगदान दिले आहे. संस्थेअंतर्गत राबविलेल्या ‘कॅप फॉर स्कूल’, माय कंट्री, कोप इन माय सिटी इत्यादी प्रकल्पांचा आधीच राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर गवगवा झाला आहे. फ्रांसच्या ‘क्लायमेट इंटरअक्टीव्ह’ संस्थेशी करार करून संस्था गेली दोन वर्षे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहयोगाने जागतिक तापमान संलग्नित ‘सिम्युलेशन’ व ‘कॉन्फरन्स आॅफ पार्टीज’चे प्रतिरूप सादर करून नवयुवकांना हवामान बदलाशी अवगत करीत आहे.