लॉकडाउनचा फटका : सराफा व्यावसायिकांची कोट्यवधींची उलाढाल ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 04:46 PM2020-04-21T16:46:47+5:302020-04-21T16:46:58+5:30
पश्चिम वऱ्हाडातील सुवर्ण व्यवसायाचा विचार केल्यास कोट्यवधी रुपयांची उलाढाल थांबली आहे.
- अमोल कल्याणकर
मालेगाव (वाशिम) : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संचारबंदी व लॉकडाउन असल्याने याचा फटका उद्योग, व्यवसायालाही बसत आहे. २३ मार्चपासून सराफा व्यवसाय बंद असल्यामुळे गुढीपाढव्यानंतर आता अक्षयतृतीयेवरही कोरोनाचे सावट निर्माण होण्याची शक्यता सराफा व्यावसायिकांमधून वर्तविली जात आहे. पश्चिम वºहाडातील सुवर्ण व्यवसायाचा विचार केल्यास कोट्यवधी रुपयांची उलाढाल थांबली आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर सर्वत्र प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ३ मे पर्यंत संचारबंदी लागू आहे. २३ मार्चपासून अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता उर्वरीत सर्व दुकाने बंद आहेत. यामध्ये सराफा व्यवसायाचादेखील समावेश आहे. या बंद काळात लग्नतिथी, गुढीपाडवा मुहूर्तावर सराफा दुकाने बंद असल्यामुळे आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले. त्यानंतर साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेली अक्षय तृतिया २६ एप्रिल रोजी आहे. अक्षयतृतीयेलादेखील सराफा व्यवसायात मोठी उलाढाल होत असते. या मुहुर्तावर अनेक लोक सोने खरेदी करतात. परंतु, कोरोनामुळे अक्षयतृतीयेलादेखील सराफा दुकाने बंद राहण्याची शक्यता व्यावसायिकांमधून वर्तविली जात आहे. सराफा व्यावसायिक हे अ वर्गात येतात तर कारागीर हे घटक ब वर्गात येतात. वाशिम जिल्ह्यातील एका हजारांहून अधिक, बुलडाणा जिल्ह्यात २२०० पेक्षा अधिक तर अकोला जिल्ह्यात अडीच हजाराच्या आसपास कारागिरांची संख्या आहे. कारागिरांची आर्थिक परिस्थिती ही सर्वसाधारण असल्यामुळे उपासमारीची वेळ येत आहे. त्यात अनेक कारागिर हे परजिल्ह्यातील आहे. संचारबंदीपूर्वी काही कारागिर स्वजिल्ह्यात परतले तर काही कारागिर लॉकडाउननंतर निघून जाण्याची शक्यताही सराफा व्यावसायिकांनी वर्तविली.
दरवर्षी लग्नसराई तसेच सण, उत्सवाच्या पृष्ठभूमीवर अकोला, वाशिम, बुलडाणा या तीन जिल्ह्यात दैनंदिन कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. यावर्षी कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संचारबंदी व लॉकडाउन असल्याने सराफा प्रतिष्ठाने बंद आहेत. छोटे कारागीर आणि छोटे व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आता २६ एप्रिल रोजी अक्षय तृतीया आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत सराफा दुकाने किमान एका दिवसापुरती तरी सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी आमची मागणी आहे.
- ज्ञानेश्वर वाढणकर
सराफा व्यावसायिक, मालेगाव