LockDown Efect : रोजगार हिरावला; गोरखपूरच्या मजूरांची सायकलवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 11:37 AM2020-05-12T11:37:21+5:302020-05-12T11:37:52+5:30
मजुर व युवकांनी पुणे येथून औरंगाबाद, जालना मार्गे शिरपूर आणि त्यापुढे मालेगाव मार्गे आपल्या राज्याकडे परतीचा प्रवास सुरू केला.
- शंकर वाघ
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन : कोरोना विषाणू संसर्गामुळे पुणे येथील एका कंपनीत कामाला असलेल्या उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील पाच ते सहा युवकांचा रोजगार गेला. मोलमजुरी करण्यासाठी गेलेल्या उत्तरप्रदेशातील ३० मजुरांच्या हातालाही काम नाही. अशा परिस्थितीत या मजुर व युवकांनी पुणे येथून औरंगाबाद, जालना मार्गे शिरपूर आणि त्यापुढे मालेगाव मार्गे आपल्या राज्याकडे परतीचा प्रवास सुरू केला. ११ मे रोजी सायकलस्वार युवकांनी शिरपूर परिसरात थोडी विश्रांती घेतल्यानंतर पुढे ते मार्गस्थ झाले.
रोजगारानिमित्त परराज्यातील अनेक कुटुंब महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात विविध कंपन्या, उद्योग व्यवसायात कामगार म्हणून काम करीत होते. कोरोना विषाणू संसर्गामुळे उद्योग विश्वच संकटात सापडल्याने लॉकडाउनच्या कालावधीत उद्योग व्यवसाय ठप्प आहेत. पुणे, मुंबई भागातील उद्योग व्यवसाय सुरू कधी होतील, याचा कोणताही अंदाज तुर्तास तरी बांधता येत नाही. रोजगार नसल्याने गोरखपूर येथील पाच ते सहा युवक तसेच उत्तर प्रदेशातील ३० मजुरांचे दोन वेळ जेवणाचेही वांधे झाले. आपापल्या राज्यात जाण्याची परवानगी मिळाल्याने हे युवक व मजूर गोरखपूरकडे निघाले. यामध्ये तीन युवक सायकलवर तर उर्वरीत युवक व मजूर हे पायदळ गावाकडे निघाले आहेत. जेवनाची कोणतीही व्यवस्था नाही. जेथे मुक्काम केला जातो, तेथील गावकरी जेवनाची व्यवस्था करतात तर काही ठिकाणी अशी व्यवस्थाही नसते, असे एका मजुराने सांगितले. सोमवारी मजुरांनी शिरपूर परिसरात काही वेळ विश्रांती घेऊन मालेगाव मार्गे पुढे मार्गस्थ झाले.
उद्योग बंद; कामधंदेही बंद
पुणे येथील एका कंपनीत कामाला असल्याने दर महिन्याला वेतन मिळत होते. कोरोना विषाणू संसर्गामुळे लॉकडाउन असल्याने पुण्यातील सर्व उद्योग धंदे, कंपन्या बंदस्थितीत आहेत. त्यामुळे मालकांनी बंद काळात वेतन देण्यास नकार दिला.
उद्योगधंदे बंद आणि अन्य कोणतेही काम नसल्याने गावी परत जात असल्याचे मजुरांनी सांगितले.
ना जेवण ना पाणी
गोरखपूर येथील या युवकांकडे ना जेवणाची व्यवस्था आहे ना पिण्याच्या पाण्याची; मात्र तरीही त्यांनी सायकलने प्रवास सुरू केला. जालना जिल्ह्यातील देउळगाव येथे एका सहृदयी व्यक्तीने भोजन दिले होते. मधात काही जणांनी थोडाफार नाश्ता दिला. शिरपूर परिसरात सदर युवक आल्यानंतर त्यांची दयनिय परिस्थिती पाहून, त्यांना नाश्ता व भोजन देण्यात आले. उत्तर प्रदेशातील मजुरांनादेखील नाश्ता व भोजन देण्यात आले. त्यानंतर ते पुढे मार्गस्थ झाले.